इंदूर: ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जामुळे आणखी एक कुटुंब उद्धवस्त झालं. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणाऱ्या अमित यादवने आधी पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली, नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अमितने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तो म्हणतो, 'माणूस वाईट नसतो, पण परिस्थिती अशी झालीये...'
सुसाईड नोटमध्ये काय लिहिले..?'मला जगण्याची इच्छा आहे, पण माझी परिस्थिती आता अशी राहिली नाही. मी वाईट नाही, पण परिस्थिती तशी पूर्वीप्रमाणे राहिली नाही...मी अनेक ऑनलाइन अॅप्सवरून कर्ज घेतले, पण मला कर्ज फेडता येत नाहीये. कारवाईच्या भीतीने मी हे पाऊल उचलत आहे. पोलिसांनी माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नये, यासाठी मी एकटाच दोषी आहे.'
'कुटुंबियांना एक गोष्ट सांगायची आहे की, मी पॅनकार्डवर कर्ज आहे. जर पॅनकार्डधारकाचा मृत्यू झाला तर कर्ज अस्तित्वात नसते, त्यामुळे माझे कर्ज कोणाला भरण्याची गरज नाही. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी भांडू नये, ही माझी शेवटची इच्छा आहे. हे पत्र माझ्या कुटुंबातील सदस्याने वाचले पाहिजे. आई, मी जात आहे…' असे अमितने लिहून आत्महत्या केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मध्य प्रदेशातील सागर येथील रहिवासी असलेला अमित यादव आपल्या कुटुंबासोबत इंदूरमध्ये राहत होता. मंगळवारी सकाळी अमितने घरच्यांचा फोन उचलला नाही, त्यामुळे भगीरथपुरा येथे राहणाऱ्या त्याच्या सासरच्यांना कळवण्यात आले. यानंतर सासू-सासरे व कुटुंबीय अमितच्या खोलीवर पोहोचले असता कोणीही दरवाजा उघडला नाही. यानंतर बाणगंगा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता, अमित यादवचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आणि शेजारीच दोन्ही मुले आणि पत्नी बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्याची नाडी तपासली असता तो मृतावस्थेत आढळून आला.
अमितने आधी पत्नी आणि मुलाची हत्या केली आणि नंतर गळफास लावून घेतला. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, गृहराज्यमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. ऑनलाइन अॅपवरून कर्ज घेण्याच्या प्रक्रियेची चौकशी केली जाईल, काही आक्षेपार्ह आढळल्यास योग्य कारवाई होईल. मी स्वत: सायबर टीमला या प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.