नवी दिल्ली - मध्यप्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपानंतर कमलनाथ यांनी आजअखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मध्यप्रदेशात कमळ फुलणार की कमलनाथ आपली सत्ता कायम राखणार यावर तर्कवितर्क लढवले जात होते. याला आज पूर्णविराम मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यप्रदेश विधानसभेचे विशेष सत्र आज बोलविण्यात आले आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसने माघार घेतल्याचे चित्र होते. काँग्रेसनेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कमलनाथ यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता कमलनाथ यांनी आपण राज्यपालांकडे राजीनामा सोपविण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले.
राज्यातील काँग्रेस सरकारमधील 22 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मध्यप्रदेशात मोठा राजकीय भूकंप झाला होता. विधानसभा अध्यक्षांनी 22 पैकी सहा आमदारांचे राजीनामा मंजूर केले होते. त्यानंतर उर्वरित 16 आमदारांचे देखील राजीनामे मंजूर कऱण्यात आले. कमलनाथ सरकारला चार अपक्ष, दोन बसपा आणि एक समाजवादी पक्षाच्या आमदारांचे समर्थन आहे. मात्र सरकार टीकवण्यासाठी हे पुरेस नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान मध्यप्रदेशला पराभूत करून भाजपला वाटत, ते विजयी होतील. मात्र त्यांना कधीही यश मिळणार नसल्याची टीका कमलनाथ यांनी भाजपवर केली.