गुड न्यूज! पन्नास वर्षांनंतर भारतात चित्त्याचा जन्म; PM मोदींनी शेअर केला व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:41 PM2023-03-29T18:41:21+5:302023-03-29T18:42:11+5:30
कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आलेल्या सियाने 4 पिलांना जन्म दिला आहे. भारतात चित्ता परतला, ही देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
Kuno National Park : भारताच्या जंगलात एकेकाळी चित्त्यांची मोठी संख्या होती. पण, शिकारीमुळे भारतातील सर्व चित्ते मरण पावले. यानंतर आता पाच दशकांनंतर पहिल्यांदाच भारतात चित्त्याचा जन्म झाला आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या मादी चित्ता सियाने बुधवारी 4 पिलांना जन्म दिला. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. सियायाच्या गरोदर असल्याची माहिती कुनो नॅशनल पार्कच्या व्यवस्थापनाला 20 दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून तिच्यावर विशेष उपचार सुरू होते. मादी चित्ता साशा हिचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे या पिलांचा जन्म महत्वाचा मानला जात आहे.
पीएम मोदींनी वनमंत्र्यांचा व्हिडिओ रिट्विट केला:-
Wonderful news. https://t.co/oPvVBNlhqC
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2023
नामिबियातून आणल्यानंतर 50 दिवस या चित्त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यानंतर गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो येथे नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांना सोडले होते. त्यानंतर यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांची दुसरी तुकडी कुनो येथे आणण्यात आली. भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत दरवर्षी किमान बारा चित्ते भारतात आणले जाणार आहेत. हे चित्ते भारतातील विविध राष्ट्रीय उद्यानांमध्ये सोडण्यात येतील.
चित्ताचा गर्भधारणा कालावधी 90 दिवसांचा
मुख्य वनसंरक्षक जे.एस. चौहान यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही सियाच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. ती पिलांना जन्म देणार याची आम्हाला जाणीव झाली होती. बुधवारी ती शिकार करायला गेली असता, नामिबियातून आलेले चित्ता तज्ज्ञ इलाई वॉकर यांनी तिला पिलांना जन्म देताना पाहिले. कुनोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सियाने नामिबियातून पहिल्या तुकडीत आलेल्या एल्टन किंवा फ्रेडीसोबत मेटींग केली आहे.