लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता जेमतेम आठवडा उरला आहेत. त्यामुळे सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात आघाडी उघडणाऱ्या राहुल गांधी यांच्या प्रचारसभाही देशाच्या विविध भागात होत आहेत. मात्र मध्य प्रदेशमधील राहुल गांधींच्या प्रचारसभेपूर्वी काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
मध्य प्रदेशमधील मंडला लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांची आज प्रचारसभा होत आहे. मात्र या सभेपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचं झालं असं की, राहुल गांधींची जिथे प्रचारसभा होणार आहे. तेथील मंचावर असलेल्या फलकावर भाजपाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांचा फोटो लावलेला होता. ही चूक लक्षात आल्यानंतर तिथे असलेल्या कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कागद लावून तो फोटो झाकला आणि तिथे काँग्रेसचे आमदार रजनीश सिंह यांचा फोटो चिकटवला. आता या फोटोचा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तो फोटो झाकतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मंडला लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते फग्गनसिंह कुलस्ते हे निवडणुकीच्या रिंगणात असून, काँग्रेसने दिंडोरीचे आमदार ओंकारसिंह मरकाम यांना उमेदवारी दिली आहे.फग्गनसिंह कुलस्ते यांनी या मतदारसंघातून सहा वेळा विजय मिळवलेला आहे. २०१४ मध्ये या मतदारसंघात फग्गनसिंह कुलस्ते आणि ओंकार सिंग मरकाम यांच्यात लढत झाली होती. त्यात कुलस्ते यांनी विजय मिळवला होता.