मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धोबीपछाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 13:00 IST2019-05-23T12:58:04+5:302019-05-23T13:00:13+5:30
Lok Sabha Election Results Live: भाजपाची जोरदार आघाडी

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धोबीपछाड
भोपाळ: यंदाच्या निवडणुकीत मध्य प्रदेशात बंपर मतदान झालं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात तब्बल 9.59 टक्क्यांची वाढ झाली. मतदानाची ही वाढलेली टक्केवारी हाताला साथ देणार की हाताला चार हात लांब ठेऊन कमळ फुलवणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने राज्यातील 29 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. यंदाही राज्यातील जनता पंतप्रधान मोदींच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असे अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मध्य प्रदेशात भाजपानं 28 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे यंदाही भाजपाला मध्य प्रदेशात घवघवीत यश मिळताना दिसत आहे.
गेल्या वर्षी भाजपाने मध्य प्रदेशातील सत्ता गमावली. तब्बल दीड दशक सत्तेत असलेल्या भाजपाला थोड्या फरकाने राज्य गमवावं लागलं. विशेष म्हणजे भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा अधिक होती. याशिवाय राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या कामगिरीचा परिणाम थेट विधानसभेत दिसू शकतो. त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.