- अभिलाष खांडेकरभोपाळ : एनसीआरबीच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले असून, यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.
संपूर्ण राज्यात मामा म्हणून ओळख असलेले मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यावर माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी टीकास्त्र सोडले आहे. राज्यात अनेक वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून ‘बेटी बचाओ’ मोहीम सुरू करण्यात आली होती. तसेच या मोहिमेचे ते श्रेय घेत होते. तथापि, नव्याने जारी करण्यात आलेल्या एनसीआरबी अहवालात मध्य प्रदेश बेपत्ता मुलींच्या राज्यांच्या यादीत सर्वात वर आहे. २०२१मध्ये १८ वर्षांवरील ९,४०७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल (८,४७८) व तामिळनाडू (४,९१४) यांचा क्रमांक आहे.
देशभरात ५४,९६२ अल्पवयीन मुली मानवी तस्करीला बळी पडतात किंवा शारीरिक छळाला बळी पडतात. मध्य प्रदेशात २०२०मध्ये म्हणजेच कोरोनाच्या कालावधीत ही संख्या ७,२३० होती. २०१९मध्ये ही संख्या ८,५७२ होती.
१७ टक्के बेपत्ता मुली मध्य प्रदेशातीलदेशातील एकूण बेपत्ता मुलींपैकी१७ टक्के मुली राज्यातील असल्याचे तथ्य पुढे आले असून, यामुळे मध्य प्रदेशातील भाजपशासित राज्याचे दावे पोकळ ठरले आहेत. ‘लोकमत’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने सुरू करणार आहेत.
सुशासनाचा दावा पोकळ - कमलनाथकमलनाथ यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारचा सर्व स्तरांवरील सुशासनाचा दावा एनसीआरबीच्या अहवालाने खोटा ठरला आहे. प्रत्येक तीन तासांनी निरपराध अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत असून, हे निषेधार्ह आहे. कमलनाथ यांनी ट्वीटमध्ये भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, राज्यात एससी, एसटी समुदायावरील अत्याचार वाढले आहेत. मुली बेपत्ता हाेण्याच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात आघाडीवर आहे. भाजपला मोठ्या प्रमाणावर मते देणाऱ्या दोन समुदायांच्या विरोधातील गुन्हे ९.३८ टक्क्यांनी वाढले आहेत.