नवी दिल्ली : निवडणूक खर्चाचा चुकीचा हिशेब दिल्याबद्दल निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशचे जलसंसाधन व संसदीय कार्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांना तीन वर्षांसाठी अपात्र घोषित केले.या निर्णयामुळे डॉ. मिश्रा यांचे सध्याचे आमदारपद जाईल. अपात्रतेमुळे २०१८ मधील निवडणूकही लढविता येणार नाही. तीन निवडणुकांमध्ये मिश्रा दातिया मतदारसंघातून भाजपातर्फे निवडून येत होते. आयोगाने हा निकाल २००८ मधील निवडणुकीच्या संदर्भात दिला आहे. त्यावेळी मिश्रा यांनी हिशेब सादर करताना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पेड न्यूज’साठी केलेल्या खर्च दिला नसल्याची तक्रार काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेंद्र भारती यांनी केली होती.वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या मतदारांना आवाहन करणाऱ्या मजकुराची आपल्याला कल्पना नव्हती. त्याचा खर्च हिशेबात धरला तरी निवडणुकीवरील आपला एकूण खर्च कायद्याने ठरवून दिलेल्या कमाल मर्यादेच्या बाहेर जात नाही. त्यामुळे यावरून आपल्याला अपात्र घोषित केले जाऊ शकत नाही, असा बचाव डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी आयोगापुढे केला होता. डॉ. मिश्रा यांचा हा बचाव अमान्य करताना मुख्य निवडणूक आयुक्ता डॉ. नसिम झैदी व निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती आणि ओ. पी. रावत यांनी ६९ पानी निकलपत्रात म्हटले की, या ‘पेड न्यूज’ मिश्रा यांच्या नावाने व छायाचित्रासह प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याची कल्पना नव्हती हे त्यांचे म्हणणे अविश्वसनीय आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने अशोक चव्हाण प्रकरणात दिलेल्या निकालानुसार अपात्रतेसाठी खर्चाची मर्यादा ओलांडणे एवढाच निकष नाही. खर्चाची एखादी बाब उमेदवाराने हिशेबातून हेतुपुरस्सर दडवून ठेवणे हे कारणही अपात्रतेसाठी पुरेसे आहे. (वृत्तसंस्था)
मध्य प्रदेशचे मंत्री तीन वर्षांसाठी अपात्र
By admin | Published: June 25, 2017 12:53 AM