माझं काम झालं... ठरल्याप्रमाणे चप्पल पाडली अन् बाईक थांबवून पतीला संपवलं, पत्नीनेच केला पहिला वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:30 IST2025-04-18T17:27:16+5:302025-04-18T17:30:17+5:30
अल्पवयीन पत्नीने प्रियकारसह मिळून पतीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली.

माझं काम झालं... ठरल्याप्रमाणे चप्पल पाडली अन् बाईक थांबवून पतीला संपवलं, पत्नीनेच केला पहिला वार
MP Crime: मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील इंदूर-इच्छावर महामार्गावरील आयटीआय कॉलेजजवळील शेतात रविवारी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृतदेहाजवळील शेतात काही अंतरावर तरुणाची दुचाकीही सापडली. शनिवारी तरुण त्याच्या पत्नीसह घरातून निघाला होता. मात्र शेतात तरुणाचा मृतदेह सापडला आणि पत्नी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांचा पत्नीवर संशय बळावला आणि धक्कादायक सत्य समोर आले. अल्पवयीन पत्नीने ३६ वेळा भोकसून पतीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार तिने व्हिडीओ कॉल करुन प्रियकराला दाखवला होता.
१३ एप्रिल रोजी इंदूर-इच्छापूर महामार्गावरील बुरहानपूर आयटीआय कॉलेजजवळील झुडपात राहुल पांडे उर्फ गोल्डन या तरुणाचा मृतदेह आढळला होता. तपासादरम्यान, या हत्येची खरी सूत्रधार राहुलची अल्पवयीन पत्नी असल्याचे निष्पन्न झाले. राहुलच्या पत्नीने प्रियकरासह तिच्या पतीला मारण्याचा कट रचला होता. प्रियकराच्या दोन मित्रांच्या मदतीने पत्नीने राहुल पांडेची हत्या केली. यानंतर तिने प्रियकराला व्हिडिओ कॉल केला आणि त्याला तिच्या पतीचा मृतदेह दाखवला. एवढेच नाही तर जानू माझे काम झाले आहे, असेही तिने म्हटलं.
प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर समोर आला प्लॅन
२५ वर्षीय राहुलची त्याच्या १७ वर्षीय पत्नी आणि प्रियकराच्या दोन मित्रांनी तुटलेल्या बिअरच्या बाटलीने वार करून हत्या केली. त्यानंतर तिघेही पळून गेले. राहुलवर ३६ वेळा वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. राहुलची पत्नी या घटनेपासून फरार होती. राहुल १२ एप्रिल रोजी पत्नीसह घराबाहेर पडला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह सापडला. राहुलच्या पत्नीचे युवराजशी प्रेमसंबंध असल्याचेही समोर आले. मग पोलिसांना संशय आला आणि त्यांनी या दिशेने तपास केला. युवराजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या प्रेयसीसोबत राहुलच्या हत्येची योजना आखल्याची कबुली दिली.
पहिला वार पत्नीनेच केला
१२ एप्रिलच्या रात्री ८:०० ते ८:३० च्या दरम्यान, अल्पवयीन मुलीने युवराजला राहुलचा रक्ताने माखलेला मृतदेह दाखवण्यासाठी व्हिडिओ कॉल केला आणि काम पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिघेही तिथून पळून गेले. त्यानंतर राहुलच्या पत्नीसह तिघांना पोलिसांनी सानवेर येथून ताब्यात घेतले. चौकशीत तिने राहुलला खरेदीच्या बहाण्याने बाहेर नेले होते. बाजारातून परतल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवले. मागून दोन्ही आरोपी त्यांच्यामागे येत होते. ठरल्याप्रमाणे राहुलच्या पत्नीने मुद्दाम आयटीआय कॉलेजसमोरील स्पीड ब्रेकरजवळ तिची चप्पल खाली टाकली आणि त्याला थांबण्यास सांगितले. गाडी थांबताच, दोघांनीही राहुलला झुडपात ओढत नेले आणि त्याच्यावर हल्ला केला. पहिला वार राहुलच्या पत्नीनेच केला ज्यामुळे तो बेशुद्ध झाला.
त्यानंतर एका आरोपीने दुसऱ्या बाटलीने वार केले तर तिसऱ्या आरोपीने राहुलवर धारदार शस्त्राने वार केले. ज्यामुळ राहुल पांडेचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर, तिन्ही आरोपी रावेर रेल्वे स्थानकावर गेले आणि इटारसीला जाण्यासाठी ट्रेनने उज्जैनला गेले. संपूर्ण गुन्ह्यात, चारही आरोपी फोनवर एकमेकांच्या संपर्कात होते.