पत्नीच्या आत्महत्येला पतीची प्रेयसी जबाबदार नाही- हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 01:26 PM2018-08-31T13:26:56+5:302018-08-31T13:38:57+5:30
आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध होते, केवळ एवढ्या कारणावरून कोणत्याही महिलेविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असे मत कोर्टानं सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे.
जबलपूर/भोपाळ - हुंडा बळी प्रकरणातील सुनावणीदरम्यान मध्य प्रदेश हायकोर्टानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध होते, केवळ एवढ्या कारणावरून कोणत्याही महिलेविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असे मत कोर्टानं सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
तीन वर्षांपूर्वी कथिरित्या घरगुती छळाला कंटाळून 14 डिसेंबर 2015 रोजी अविनाश सिंह या व्यक्तीच्या पत्नीनं आत्महत्या केली होती. एका महिलेसोबत माझ्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि या कारणामुळे पतीकडून माझा छळ होत होता, अशी माहिती पीडित महिलेनं पोलिसांना मृत्यूपूर्वी दिली होती. पीडितेच्या जबाबानंतर तिच्या पतीसहीत प्रेयसीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या दोघांविरोधात कलम 304 (सदोष मनुष्य वध) आणि 498-अ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते. कोर्टाच्या आदेशाविरोधात पतीच्या प्रेयसीनं जबलपूर हायकोर्टात आव्हान दिले.
बुधवारी याप्रकरणी न्यायाधीश अंजुली पालो यांच्या खंडपीठानं महिलेचे नाव आरोपपत्रातून काढण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित महिलेविरोधात हुंडा बळी आणि सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल होऊ शकत नाही. केवळ पीडित महिलेसोबत पतीचे विवाहबाह्य संबंध होते, याआधारे खटलादेखील चालवला जाऊ शकत नाही.