नवी दिल्ली - भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींची जन्मभूमी असलेल्या इंदूरमध्येही नागरिक शोककुल आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. लतादीदींना श्रद्धांजली वाहत त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले आहे. यावेळी त्यांनी लतादीदींच्या नावाने संगीत अकादमी आणि विद्यापीठ सुरू करण्यापासून त्यांचा पुतळा उभारण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
शिवराज सिंह चौहान यांनी "लतादीदींच्या निधनाने कोट्यवधी भारतीयांना त्यांचे वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना आहे. त्यांच्या गाण्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा संचारली. पण लतादीदींच्या जाण्याने आपल्याही आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून काढता येणार नाही" असं म्हटलं आहे. लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मरणार्थ इंदूरमध्ये संगीत अकादमी, संगीत विद्यापीठ आणि संग्रहालय स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री चौहान यांनी केली. संगीत विद्यापीठात मुलांना सुरांचा सराव करता येईल. तर, त्यांची सर्व गाणी संग्रहालयात उपलब्ध असतील असंही म्हटलं आहे.
लतादीदींचा पुतळाही उभारण्याची घोषणा
लतादीदी या केवळ संगीत विश्वापर्यंत मर्यादित नव्हत्या, तर त्यांनी देशाला देशभक्तीची प्रेरणा दिली. लतादीदींच्या वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच इंदूरमध्ये लतादीदींचा पुतळाही उभारण्याची घोषणा यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 1991 मध्ये 'लेकिन' हा अल्बम प्रदर्शित झाला होता. हे गीत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी कम्पोज केलं होतं. जवळपास तीन दशकांपूर्वी राजस्थानमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी गरीबांच्या मदतीसाठी जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी लतादीदी या जयपूरला आल्या होत्या.
...तेव्हा लतादीदींनी मुख्यमंत्र्यांना केली होती 1 कोटीची आर्थिक मदत
जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला जवळपास 40हजार प्रेक्षक आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री हरिदेव जोशी यांनी तिकीट काढून सवाई मानसिंह मैदानात प्रेक्षकांमध्ये बसून लतादीदींचे गाणे ऐकले होते. भीषण दुष्काळात पीडितांच्या मदतीसाठी लता मंगेशकर यांनी 1 कोटी 1 लाख रुपयांचा धनादेश हरिदेव जोशी यांच्याकडे सुपूर्द केला होता. लता मंगेशकर यांच्या आवाजानं प्रत्येक देशवासियाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांची हजारो गाणी प्रत्येकाच्या ओठांवर आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.