भोपाळ : भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्य प्रदेशच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून आज सायंकाळी सात वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे. २० मार्चला कमलनाथ यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे सरकार पडले होते. काँग्रेसचे आमदार फोडण्यामागे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानच असल्याने त्यांचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले आहे.
शिवराजसिंह चौहान यांनी २००५ ते २०१८ असे तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. चौहान पुन्हा मुख्यमंत्री बनल्यास चौथ्यांदा एकच मुख्यमंत्री होणारे हे पहिलेच असणार आहेत. शिवराजसिंहांव्यतिरिक्त अर्जुन सिंह आणि श्यामाचरण शुक्ल यांनी तीनवेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये शिवराजसिंहांसह नरेंद्र सिंह तोमर आणि नरोत्तम मिश्रा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी शिवराजसिंह यांच्या नावावर संमती दर्शविल्याचे सुत्रांनी सांगितले. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.
सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाचे सरकार २०१८ मध्ये गेले होते. यामुळे शिवराजसिंह चौहान यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. यामुळे नवा मुख्यमंत्री देण्याची मागणीही होत होती. तसेच शिवराज यांना दिल्लीत पाठविण्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी राज्यातच राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. विधानसभा हरल्यानंतरही शिवराजसिंह राज्यातील राजकारणात सक्रीय झाले होते. ज्य़ोतिरादित्या शिंदेंसोबत त्यांनी जानेवारीमध्ये पहिली चर्चा केली होती. यानंतर दोन महिन्यांनी मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला होता. १७ दिवस चाललेल्या सत्तासंघर्षामध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती.