सिंगरौली: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून धक्कादायक आणि प्रशासनाला लाजवणारी घटना समोर आली आहे. रुग्णवाहिकेने मृत नवजात बालकाचा मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला, यामुळे नाराज वडिलांनी मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये बाळाचा मृतदेह ठेऊन थेट कलेक्टर ऑफीस गाठले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी दिनेश भारती यांची पत्नी मीना भारती हिला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सिंगरौली जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टर सरिता शहा यांनी महिलेची प्रसूती करण्याऐवजी खासगी दवाखान्यात पाठवले आणि 5 हजार रुपयेही घेतले. यादरम्यान गर्भातच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे, महिलेला पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे डिलिव्हरी झाली आणि मृत मुलला जन्माला आला.
मुलाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयातील लोकांकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र रुग्णवाहिका देण्यात आली नाही. त्यानंतर वडील दिनेश भारती यांनी मृत मुलाचा मृतदेह एका पाकिटात पॅक करुन मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवला आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. वडिलांनी आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएमला तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तपासात तथ्य आढळून आल्यास आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.