मध्य प्रदेशात मिशनरी शाळेवर दगडफेक, विद्यार्थ्यांचे धर्मांतर केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 12:22 PM2021-12-07T12:22:31+5:302021-12-07T12:23:35+5:30
दगडफेक होत असताना 12वीचे काही विद्यार्थी शाळेत परीक्षा देत होते.
विदिशा: मध्य प्रदेशातील विदिशा येथील एका मिशनरी शाळेत(ख्रिश्चन शाळा) दगडफेक आणि नासधूस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही हिंदू संघटनांनी शाळा व्यवस्थापनावर 8 मुलांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे. कथित धर्मांतराच्या निषेधार्थ शाळेवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दगडफेक होत असताना शाळेमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील गंजबासोडा शहरातील सेंट जोसेफ स्कूलमध्ये हिंदू संघटनेच्या काही संतप्त लोकांनी शाळेच्या आवारात गोंधळ घातला. यावेळी त्यांनी शाळेवर दगडफेक करत नासधुसही केली. शाळेत मुलांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दगडफेक होत असताना सेंट जोसेफ स्कूलमध्ये 12वीच्या 14 विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. यात घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले आहे. काही दिवसांपूर्वी सेंट जोसेफ शाळेतील 8 मुलांचे कथित धर्मांतराचे प्रकरण समोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने याबाबत निवेदने दिली जात होती. आता हा गोंधळ पाहता शहरातील स्थानिक चर्च, भारत माता कॉन्व्हेंट स्कूल आणि सेंट जोसेफ स्कूलमध्ये पोलिस प्रशासन तैनात करण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील एसपी आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सोशल मीडियावर धर्मांतराची चर्चा
गेल्या काही दिवसांपासून गंजबासोडा येथील सेंट जोसेफ शाळेचे नाव धर्मांतराच्या संदर्भात सोशल मीडियावर चर्चेत होते. सोशल मीडियावर एक फोटोही पोस्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये मुलांवर पाणी शिंपडून त्यांना ख्रिश्चन बनवले जात असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. यामुळे गावातील नागरिक संतापले आणि त्यांनी शाळेवर दगडफेक केली. दरम्यान, या घटनेनंतर गंजबासोडा येथील इतर मिशनरी शाळा आणि चर्चमध्ये सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.