अनोखी निवडणूक; सरपंच पदाचा लिलाव, 44 लाखांची बोली लावणारा झाला गावचा सरपंच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 02:23 PM2021-12-16T14:23:45+5:302021-12-16T14:30:11+5:30
या बोलीत लावलेले पैसे गावाच्या विकासासाठी वापरले जाणार आहेत.
भोपाळ: सध्या सर्वत्र निवडणुकांचे वातावरण आहे. पुढील वर्षात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. पण, सध्या मध्य प्रदेशातील एका निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशातील एका गावामध्ये पंचायत सदस्यांनी सरपंच निवडण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली.
सरपंच पदासाठी लिलाव
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायतीमधील सदस्यांनी सरपंच पदासाठी मतदान न घेता चक्क लिलाव ठेवला. सरपंच पदासाठी चार जणांनी बोली लावली होती. यामागे गावकऱ्यांचा तर्क असा आहे की, उमेदवार जिंकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने पैशांचा वापर करतो. पण, लिलावत असे करू शकणार नाही, शिवाय बोलीतून मिळालेल्या पैशातून गावाचा विकास होईल. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा आणि तणावही राहणार नाही. ही अनोखी निवडणूक मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील भटौली ग्रामपंचायतीमध्ये झाली आहे.
44 लाखांची सर्वोच्च बोली
उमेदवारांच्या निवडीसाठी 21 लाख रुपयांपासून बोलीला सुरुवात झाली होती. एक-एक करत उमेदवार बोली लावत होते, पण अखेर 44 लाखांच्या बोलीवर सरपंच पद फायनल झाले. सौभागसिंग यादव 44 लाखांची बोली लावणाऱ्या नवनियुक्त सरपंचाचे नाव आहे. हा लिलाव झाला असला तरी, नियमाप्रमाणे गावात निवडणूक होणारच आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासह योग्य निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण, आता या निवडणूक प्रक्रियेत फक्त सौभागसिंग यादव अर्ज दाखल करले, त्याच्याविरोधात गावातील इरर कुणीही अर्ज दाखल करणार नाही, अशी माहिती गावातील लोकांनी दिली आहे. म्हणजेच आता सौभागसिंगचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा आहे.