मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा प्रज्ञा सिंह यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पहाटे मशिदींमध्ये होणाऱ्या अजानवर आक्षेप घेतला आहे. "पहाटे अजानमुळे लोकांची झोप मोड होते. रुग्णांचा देखील हे लोक विचार करत नाहीत आणि साधू-संतांच्या साधनेत यामुळे भंग होतो", असं प्रज्ञा सिंह ठाकूर एका कार्यक्रमात म्हणाल्या.
"इतर समुदायाच्या प्रार्थनेवेळी मोठ्या आवाजात भजन, किर्तन करु नका असं आपल्याला सांगितलं जातं. पण हे लोक पहाटे पहाटे अजान करुन लोकांची झोप मोड करतात. पहाटे ५ वाजता अजानमुळे लोकांची झोप उडते. रुग्णांना त्रास होतो. साधू-संत पूर्जा अर्चा किंवा ध्यान साधना पहाटे सुरू असते. त्यांनाही व्यत्यय येतो. आरतीची वेळ देखील सकाळी असते आणि त्यावेळी यांचे लाऊडस्पीकर, भोंगे जोरजोरात वाजत असतात. त्याचा त्रास होतो", असं प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या. आम्ही हिंदू लोक सर्वधर्म समभावाचा सन्मान करतो. पण इतर कोणता धर्म असं वागतो का?, असंही त्या म्हणाल्या.
गांधी कुटुंबीयांवर साधला निशाणासाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी याआधी गांधी कुटुंबीयांवरही निशाणा साधला होता. "कुटुंबातील एका मुलाला राजकारण जमत नाही. म्हणून आता मुलीला ते घेऊन आले आहेत आणि तिही नौंटकी करत आहे", असं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या. भोपाळमध्ये वाल्मिकी समाजाच्या परिचय संमेलनात त्या बोलत होत्या.