भोपाळ - मध्य प्रदेशमधील सतना येथे नगरपालिका निवडणुकीत अवघ्या १४ मतांनी विजय मिळवणाऱ्या नवनियुक्त नगरसेवकाच्या मुलाचा विजयाचा गुलाल उधळण्याआधीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सतना नगरपालिकेतील प्रभाग क्र. ३ मधून विजयी झालेले काँग्रेसचे नगरसेवक रामू कोल यांचे पुत्र कृष्णा कोल यांना निवडणुकीच्या निकालांनंतर काही वेळातच हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ करण्यात आली. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मतमोजणीवेळी कृष्णा हे घरी जात होते. जेव्हा निकाल आला तेव्हा वडिलांच्या विजयाची बातमी त्यांना फोनवरून मिळाली. विजयाच्या बातमीने त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी ओळखीतील अनेकांना फोन करून बोलावले. मिठाई आणण्यासाठी पैसे दिले. बँड, डीजेवाल्यांना बोलावले. मात्र त्याचदरम्यान, त्यांची प्रकृती बिघडली आणि चक्कर येऊन ते खाली पडले.
त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. कृष्णा यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. घरात विजयाचा आनंद साजरा होण्यापूर्वीच दु:खद घटना घडल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
कृष्णा यांच्या वडिलांनी नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना ३९० मते मिळाली. त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा १४ मतांनी पराभव केला. भाजपाचे उमेदवार पवन कोली यांना ३७६ मतं मिळाली. निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवाराला विजयाचं प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.