फाशी लागल्याने वाघाचा मृत्यू, देशातील पहिलेच प्रकरण; हत्या की अपघात..?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 02:18 PM2022-12-07T14:18:05+5:302022-12-07T14:18:44+5:30
या भागामध्ये शिकारी सक्रिय असल्याने वनविभागाकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
पन्ना: मध्य प्रदेशातील पन्ना अभयारण्यात एका वाघाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. वाघाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून असून, वाघ स्वतःहून झाडात अडकल्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या भागात शिकारी सक्रिय असल्याने वाघाची शिकार होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात पहिल्यांदाच एका वाघाचा फाशी लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. देशात वाघाबाबत आधीच हाय अलर्ट आहे. देशातील सर्व अभयारण्यांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत ही बाब समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सरकारने कारवाईचे आदेश दिल्यानंतर वनविभागानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एसटीएफ टायगर टीम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नेमकी माहिती समोर येईल.
2009 मध्ये वाघ संपले
अडीच दशकांपूर्वीपर्यंत पन्ना हे वाघांसाठी अनुकूल अभयारण्य होते, मात्र काही कारणास्तव 2009 मध्ये येथून वाघांची संख्या शून्य झाली. यानंतर वाघांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने पन्ना येथे टायगर रिलोकेशन प्रोग्राम सुरू केला. त्यानंतर पुन्हा एकदा या अभयारण्यात वाघांची संख्या 70 हून अधिक झाली आहे.
शिकारी सक्रिय असण्याची शक्यता आहे
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पन्नामध्ये शिकारी सक्रिय असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत या वाघिणीच्या मृत्यूमागे शिकारी सापळा असण्याची दाट शक्यता आहे. वाघा झाडात लटकला गेला की, एखाद्या शिकारीने त्याला झाडाला अडकवले याचा तपास सध्या वनविभागाचे पथक करत आहे.