भोपाळ:मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात दुर्मिळ गिधाड तस्करीच्या एका आंतरराज्यीय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यासोबतच पोलिसांनी उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. कानपूरवरुन महाराष्ट्रातील मालेगाव येथे सात दुर्मिळ इजिप्शियन गिधाडांची तस्करी केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुलतानपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीच्या स्लीपर कोचमधील प्रवाशांनी दुर्गंधी आणि पक्ष्यांच्या आवाजाची तक्रार केली, त्यानंतर अधिकाऱ्यांही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि राज्य वन विभागाच्या संयुक्त पथकाने रेल्वे कोचची नाकाबंदी करुन झडती घेतली. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गिधाडे आढळून आली. खंडवा वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनिल शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले की, खंडवा आरपीएफकडून आम्हाला फोन आला की एक व्यक्ती इजिप्शियन गिधाडांची तस्करी करत आहे. आम्ही लगेच तिथे पोहोचलो. वनविभाग आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने रेल्वेवर छापा टाकून फरीद शेख याला अटक केली. त्याच्याकडून सात इजिप्शियन गिधाडे मिळाली आहेत.
आरोपी अटकेततस्कर फरीद शेख याने चौकशीदरम्यान सांगितले की, ही गिधाडे त्याला कानपूर स्थानकावर समीर खानने दिली होती. तो कानपूरचा रहिवासी आहे. खानने गिधाडांना मालेगावला घेऊन जाण्यास सांगितले होते. समीर खान याने शेखला गिधाड घेण्यासाठी 10 हजार रुपये देण्यास सांगितले होते. याप्रकरणी आरोपीविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या सर्व गिधाडे वनविभागाच्या ताब्यात आहेत.