नवी दिल्ली - कधी कोणावर कशी वेळ हे सांगता येत नाही. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. रस्त्याच्या कडेला पोलिसांना एक भिकारी दिसला. थंडीत कुडकुडणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी मदतीचा हात दिला. मात्र त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला नीट पाहिल्यानंतर आणि अधिक चौकशी केली असता पोलिसांना मोठा धक्का बसला. हैराण करणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण भीक मागणारी व्यक्ती हा पोलिसांच्याच बॅचचा ऑफिसर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरमधील पोट निवडणुकीच्या मतमोजणी नंतर दोन पोलीस अधिकारी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर परतत होते. त्याचवेळ त्यांना रस्त्याच्या कडेला थंडीने कुडकुडत असलेला एक भिकारी दिसला. पोलिसांनी गाडी थांबवली. त्या व्यक्तीला जॅकेट दिलं, बूट दिले. भिकाऱ्याची अवस्था पाहून त्यांन तो मनोरुग्ण असल्याचं समजलं. पोलिसांना यापूर्वी या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखंही सतत वाटत होतं. चौकशी केल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. कारण हा भिकारी त्यांच्याच बॅचचा पोलीस ऑफिसर असल्याचं त्यांना आठवलं.
अचूक नेम साधणारा निशाणेबाज म्हणून ते प्रसिद्ध
डीएसपी रत्नेश तोमर आणि विजय भदौरिया यांना रस्त्यात हा भिकारी दिसला. मनीष मिश्रा असं या व्यक्तीचं नाव आहे. ते गेली 10 वर्षं अशाच अवस्थेत फिरत आहेत. 1999 सालच्या बॅचचे ते पोलीस अधिकारी होते आणि त्या वेळी अचूक नेम साधणारा निशाणेबाज म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी मध्य प्रदेशात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी म्हणून काम केलं. पण 2005 च्या सुमारास त्यांना मानसिक त्रास सुरू झाला. या आजाराने त्यांची मानसिक स्थिती बिघडली.
मिश्रा यांचे वडीलही पोलीस दलात होते आणि भाऊसुद्धा अधिकारी
मनीष मिश्रा यांना उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल केलं. पण तिथून ते पळून गेले. मनीष यांची पत्नीही त्यांना सोडून गेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते भीक मागत आहेत. मिश्रा यांचे वडीलही पोलीस दलात होते आणि भाऊसुद्धा अधिकारी आहे. पोलिसांनी त्यांना एका स्वयंसेवी संस्थेत दाखल केलं असून तिथे त्यांच्यावरचे उपचार सुरू केले. एकंदरीत मनीष मिश्रा यांची अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.