Madhya Pradesh Rain: गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. या अशा परिस्थितीत अजस्त्र मगरींचाही मुक्त वावर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवपुरी जिल्ह्यातील एका निवासी वसाहतीत मगर घुसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घराबाहेर मगरींचा मुक्त वावर पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गेल्या 14 ऑगस्टचा आहे. रहिवासी भागात पावसाच्या पाण्यासोबत मगर आल्याने परिसरात खळबळ उडाली. घराबाहेर आलेल्या मगरीला पाहण्यासाठी कॉलनीतील सगळे छतावर चढले, यातील एकाने व्हिडीओ काढून व्हायरल केला. परिसरातील एका नाल्यातून मगर वसाहतीत शिरल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मगर घुसल्याची माहिती मिळताच माधव राष्ट्रीय उद्यानातून बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. सुमारे तासाभराच्या अथक परिश्रमानंतर मगरीला पकडण्यात यश आले. पकडलेल्या या मगरीची लांबी तब्बल आठ फूट होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मगरीला सांख्यसागर तलावात सोडले आहे. मगरीला पकडल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.