खरगोनमध्ये संचारबंदीत दोन तासांची सूट, घरातूनच नमाज पठण करण्याची मुस्लीम संघटनांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 11:01 AM2022-04-15T11:01:48+5:302022-04-15T11:03:13+5:30
येथे काही समाज कंटकांनी रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली होती. यानंतर, रविवारी सायंकाळपासूनच येथे संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर अद्यापही मध्य प्रदेशातील खरगोन येथे संचारबंदी लागू आहे. आजही येथे संचारबंदीतून दोन तासांची सूट देण्यात आली. येथे 10 ते 12 वाजेपर्यंत संचारबंदी शिथील करण्यात आली असून महिला आणि पुरुष दोघांनाही सूट देण्यात आली आहे. आतापर्यंत ही सूट केवळ महिलांनाच होती. दरम्यान मुस्लीम बांधवांनी रमजानमधील शुक्रवारचे नमाज पठण घरातूनच करण्याची घोषणा केली आहे.
येथे काही समाज कंटकांनी रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली होती. यानंतर, रविवारी सायंकाळपासूनच येथे संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत संचारबंदीत सूट दिल्यानंतर केवळ महिलांनाच जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात येत होती.
घरातूनच नमाज पठण करणार मुस्लीम बांधव -
खरगोनमध्ये हिंसाचारानंतर अद्यापही तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज, खरगोन येथे मुस्लीम बांधवांनी घरातूनच शुक्रवारचे नमाज पठण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मशीद समितीच्या प्रतिनिधींनी माहिती दिल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
खरगोनमध्ये रामनवमीच्या दिवशी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक मशिदीजवळून जाताना, काही समाज कंटकांनी तिच्यावर दगडफेक केली. यानंतर मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनीही याला प्रत्युत्तर देत दगडफेक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 100 जणांना अटक केली आहे.