आपल्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे की, सत्य बोलणे बंड असेल, तर समजूनजा, आम्हीही बंडखोर आहोत.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी ट्विट केले आहे, की ''सत्य बोलणे बंड असेल तर समजूनजा, आम्हीही बंडखोर आहोत. जय सनातन, जय हिंदुत्व...''. या ट्विटनंतर साध्वी प्रज्ञा यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उघडपणे भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, मुस्लिमांना सत्य सांगितल्यावर एवढा त्रास का होतो? कमलेश तिवारी यांचा उल्लेख करत साध्वी म्हणाल्या, जे बोलले त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.
त्या म्हणाल्या, काहीही होवो, मी सत्य बोलते, म्हणून कदाचित बदनाम आहे. हेही सत्य आहे की तेथे (ज्ञानवापी) शिव मंदिर होते, आहे आणि राहील. त्याला फवारा म्हणणे, हा आमच्या हिंदू आदर्शांवर, हिंदू देवी-देवता आणि सनातन संस्कृतीच्या मुळावर आघात आहे, यामुळे आम्ही सत्य काय ते सांगणारच.
आम्ही सत्य बोलत आहोत, तर मग त्रास कशाला?भाजप खासदार एवढ्यावरच थांबल्या नाही. त्या म्हणाल्या, तुम्ही आमचे वास्तव सांगा, आम्हाला मान्य आहे. मात्र, आम्ही तुमचे वास्तव सांगत आहोत, तर मग त्रास कशाला? म्हणजेच कुठे ना कुठे इतिहास घाणेरडा आहे. साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, ते आपल्या देवी-देवतांवर चित्रपट बनवतात आणि आक्षेपार्ह बोलतात. त्या म्हणाल्या, हे आजपासूनच नाही, तर त्यांना पूर्ण इतिहास आहे.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून सुरू झाला होता वाद -नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर वाद वाढला होता. यावर, अरब देशांनीही नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. यानंतर, नुपूर यांना भाजपने पदावरून दूर केले होते.