भोपाळ- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या सिनेमा समोरच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. सिनेमाचं नाव पद्मावती बदलून पद्मावत करण्यात आलं इतकंच नाही तर सिनेमा 300 कट्स देऊन प्रदर्शित होणार असला तरी सिनेमाला होत असलेला विरोध थांबायचं नाव घेत नाहीये. पद्मावत या सिनेमाला अजूनही किती विरोध कायम आहे याचं उदाहरण मध्य प्रदेशात पाहायला मिळालं. सिनेमातील ‘घुमर’ गाण्यावर नृत्य केल्याने मध्य प्रदेशात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गोंधळ घातला. रतलाम जिल्ह्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट शाळेत सोमवारी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काही विद्यार्थ्यांनी घुमर या गाण्यावर नृत्य केलं. त्यावेळी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन खुर्च्या आणि म्युझिक सिस्टिमची तोडफोड केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे. शाळेच्या बाजूलाच असलेल्या भगत सिंग पीजी महाविद्यालयातील हे चार तरूण आहेत.
ताब्यात घेतलेल्या चार तरूणांनी आपण करणी सेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत झालेल्या तोडफोडीत कोणीही जखमी झालेलं नाही. अटक करण्यात आलेल्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांवर अतिक्रमण, दंगल आणि दुसऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देवास येथील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांनी हिंदूंच्या भावना दुखावणारी गाणी वाजवू नयेत, असा आदेश काढला होता. मात्र, याविषयी स्पष्टीकरण मागितल्यानंतर हा आदेश तात्काळ मागे घेण्यात आला होता.
सिनेमाच्या वाटेत आलेले सर्व अडथळे आणि त्यानंतरची परिस्थिती पाहता ‘पद्मावत’च्या टीमने प्रसिद्ध वृत्तपत्रात एक डिस्क्लेमर प्रसिद्ध केलं आहे ‘पद्मावत’च्या डिस्क्लेमरची सोशल मीडियावरही चर्चा पाहायला मिळाली. काही नेटकऱ्यांनी या जाहिरातीविषयी उपरोधिक ट्विटही केल्याचं पाहायला मिळालं.
“हा सिनेमा प्रसिद्ध सुफी कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या ‘पद्मावत’ या महाकाव्यावर आधारित असून, हा एक काल्पनिक सिनेमा आहे. ज्यामध्ये राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यातील ड्रीम सीक्वेन्सचे एकही दृश्य नव्हते आणि यापुढेही नसेल. राजपूत संस्कृतीविषयी असलेला आदर, त्यांच्यात असलेली धैर्यशील वृत्ती या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा सिनेमा साकारण्यात आला आहे. या सिनेमात प्रचंड आदबीने राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचं चित्रण करण्यात आलं असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही’, असं या डिस्क्लेमरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.