मॉब लिन्चिंग रोखण्यासाठी 'हे' राज्य कायदा करणार; 5 वर्षांचा तुरुंगवास घडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 08:35 AM2019-06-27T08:35:43+5:302019-06-27T08:40:33+5:30
जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी कठोर कायदा
भोपाळ: देशभरात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढत आहे. जमावाकडून कायदा हाती घेतला जात असल्यानं सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. अशा घटना टाळण्यासाठी मध्य प्रदेश सरकार कठोर कायदा करणार आहे. कथित गोरक्षकांकडून करण्यात येणाऱ्या हत्या रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कायदा मंजूर करणार आहे.
सध्या मध्य प्रदेशात गोवंश हत्या, गोमांस बाळगण्यास बंदी आहे. याशिवाय गोवंशाची वाहतूक करण्यावरही बंदी आहे. मात्र या कायद्यात गोसंरक्षणावरुन होणाऱ्या हिंसेचा किंवा जमावाकडून होणाऱ्या हत्येचा उल्लेख नाही. त्यामुळेच या कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार घडवल्यास, मॉब लिन्चिंग झाल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
सप्टेंबर 2015 मध्ये उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये अखलाक नावाच्या व्यक्तीची कथित गोरक्षकांनी हत्या केली होती. अखलाक यांच्या घरात गोमांस असल्याच्या संशयावरुन जमावानं त्यांना जबर मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कथित गोरक्षकांनी अनेकांना मारहाण केली. गोमांस बाळगल्याचा, गोहत्या केल्याचा, गोमांसाची वाहतूक केल्याच्या संशयावरुन जमावानं कायदा हातात घेतल्याचे प्रकार अनेकदा घडले.