मध्य प्रदेशातील खरगोन येथे रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर, आता शिवराज सिंह सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या घरावर जिल्हा प्रशासनाने थेट बुलडोझर फिरवला आहे. शहरातील अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोटा मोहन टॉकीज परिसरात सोमवारी सरकारी अधिकाऱ्यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हिंसाचारातील आरोपींच्या घरावरून बुलडोझर फिरवला आणि त्यांची घरे जमीनदोस्त केली.
शिवराज सिंह सरकारच्या या कारवाईनंतर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत, 'मामांचे बुलडोझर बलात्कार करणाऱ्यांवर आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करणाऱ्यांवर चालत नाही. फक्त चेहरा पाहूनच बुलडेजर चालविले जात आहे."
असं आहे संपूर्ण प्रकरण -रामनवमीनिमित्त खरगोन येथे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी काही लोकांनी हुल्लडबाजी करत दगडफेक केली. यामुळे परिसरात हिंसाचार सुरू झाला. एवढेच नाही, तर यावेळी काही लोकांनी पेट्रोल बॉम्बदेखील फेकले. या संपूर्ण घटनेत सर्वसामान्यांसह 20 पोलीसही जखमी झाले होते.
या घटनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, रामनवमीच्या मुहूर्तावर खरगोनमध्ये घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मध्य प्रदेशात देंगेखोरांना कसलाही थारा नाही. या हिंसाचारातील आरोपींची ओळख पटली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.