भोपाळ – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांनी चौथ्यांदाच शपथ घेतली आहे. मंगळवारी विधानसभेत भाजपाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. सोमवारी रात्री उशीरा शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपा सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १०४ आमदारांची गरज होती. पण भाजपाला ११२ आमदारांचे पाठबळ मिळालं. तत्पूर्वी, २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ यांनी अल्पमतात असल्याने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
शिवराज सरकारला विधानसभेत एकूण ११२ आमदारांचा पाठिंबा मिळाला. यात भाजपा १०७ व्यतिरिक्त बसपा-सपा आणि अपक्ष आमदारांनीही भाजपाला पाठिंबा दर्शविला. सोमवारी शपथ घेतल्यानंतर, शिवराज चौहान यांनी चार दिवसाचे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले. २४ मार्च ते २७ मार्च दरम्यान हे अधिवेशन चालेल. विधानसभेच्या चार दिवसांच्या विशेष अधिवेशनात सभागृहाच्या एकूण तीन बैठका होतील.
कमलनाथ यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनाम्यानंतर चार दिवसांनी शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली. चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेले शिवराज चौहान हे राज्याचे पहिले नेते आहेत. शिवराज चौहान यांची सत्ता येताच विधानसभा अध्यक्ष नर्मदा प्रसाद प्रजापती यांनी मध्यरात्री सभापतीपदाचा राजीनामा दिला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारताच शिवराज सिंह चौहान अॅक्शन मोडमध्ये आले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेता त्यांनी वल्लभ भवनमधील केंद्रातील वरिष्ठ राज्य अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक घेतली, कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं. बहुमत नसल्यानं कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. मध्य प्रदेशच्या विधानसभेत एकूण २३० आमदार निवडून जातात. यातील २५ जागा सध्या रिक्त आहेत. सध्या विधानसभेत एकूण २०५ आमदार आहेत. यापैकी १०७ आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत आहे. येत्या काही दिवसांमध्ये रिक्त असलेल्या २५ जागांसाठी पोटनिवडणूक होईल. ही निवडणूक भाजपा आणि काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची असेल.