मध्य प्रदेशमध्ये सिंगरौली जिल्हा आहे. हे ठिकाण कोळसा आणि वीज उत्पादनासाठी ओळखलं जाते. सिंगरौलीला भारताची ऊर्जा राजधानी देखील म्हटलं जातं. असं सगळं असूनही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं एक आदिवासी गाव येथे आहे. या गावात वीज नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि पक्का रस्ता देखील नाही.
ग्रामस्थांचं जीवन हे अनेक अडचणींनी भरलेलं आहे. छोट्या-छोट्या सोयी-सुविधांसाठी लोकांना परिस्थितीशी झगडावं लागत आहे. वीज नसल्याने गावात अंधार असतो. रात्री भयंकर परिस्थिती असते. पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे. येथे लोकांना पाणी आणण्यासाठी खूप लांब चालत जावं लागतं. स्वत:कडे असलेलं पाणी संपलं तर आजूबाजूच्या लोकांकडे उरलेल्या पाण्यावर जगावं लागतं.
गावामध्ये काँक्रीटचे पक्के रस्ते असल्याने हे गाव बाहेरच्या जगापासून अद्यापही खूप दूर आहे. पावसाळ्यात येथील रस्ते चिखलाने तुडुंब भरल्याने परिसरातील वाहतूक ठप्प होऊन जाते. याठिकाणी कोणी आजारी पडल्यास उपचारासाठी जवळपास साधं रुग्णालय देखील नाही.
रुग्णवाहिकेसारख्या सामान्य व अत्यावश्यक सुविधांपासूनही हे गाव वंचित आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोक खाटेच्या साहाय्याने नातेवाईकांना घेऊन जातात. गावातील आदिवासींना ग्रामीण शासन व प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मूलभूत सुविधा दिल्यास गावाचा विकास आणि ग्रामस्थांचं जीवनमान हे सुधारू शकतं.