भोपाळ: मध्य प्रदेशात व्हीव्हीआयपी कल्चरचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. क्रीडामंत्री यशोधरा राजे सिंधिया यांना रेल्वे गाडीतून उतरल्यावर फार चालावं लागू नये, यासाठी त्यांची कार थेट ग्वालियारच्या प्लॅटफॉर्मवर नेण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या गेटमधून गाडी प्लॅटफॉर्मवर नेण्यात आली, त्याच ठिकाणी 'गेटच्या आता वाहन नेल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल,' असा फलक दिसत आहे. मात्र तरीही सर्व नियम धाब्यावर बसवत मंत्री महोदयांना चालण्याचे कष्ट करावे लागू नयेत, याची काळजी रेल्वे प्रशासनानं घेतली. 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. यशोधरा राजे सिंधिया यांच्या 'राजेशाही'मुळे सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सिंधिया यांची कार थेट प्लॅटफॉर्मवर आल्यानं तेथील प्रवाशांना गाडीत चढताना अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेले पोलीस यावेळी सिंधिया यांच्या गाडीला सुरक्षा पुरवत होते. मध्य प्रदेशात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी मंत्र्यांचा हा राजेशाही थाट समोर भाजपासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. भाजपा मंत्र्यांच्या या राजेशाही वृत्तीवर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. तर आपल्याला नियमांची कल्पनाच नव्हती, अशी सारवासारव सिंधिया यांनी केली आहे. विशेष म्हणजे नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. नियम धाब्यावर बसवून कार थेट प्लॅटफॉर्मवर आणणाऱ्या मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही. त्यामुळे नियम आणि कायदे फक्त सामान्य माणसासाठीच असतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भाजपाच्या मंत्र्यांचा राजेशाही थाट; पायपीट टाळण्यासाठी कार थेट प्लॅटफॉर्मवर नेण्याचा घातला घाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 9:32 AM