भोपाळ : राज्य सरकार कितीही दावे का करेना, मध्य प्रदेशातआरोग्य विभागाची गाडी रुळावर यायला तयार नाही. बरगी येथील आरोग्य केंद्रात तर निष्काळजीपणाचा असा कहरच झाला. आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसल्याने उपचाराअभावी बालकाचा आईच्या कुशीत मृत्यू झाला.
तिनहेटा देवरी येथील रहिवासी संजय पंद्रे यांनी त्यांचा आजारी मुलगा ऋषी (५) याला उलटी आणि जुलाब होत असल्याने बरगी येथील आरोग्य केंद्रात आणले होते. मात्र, आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नव्हते. अनेक तास उलटूनही डॉक्टर आलेच नाहीत. त्यामुळे लहानग्या ऋषीने तडफडून प्राण सोडला. बालकाच्या मृत्यूनंतरही अनेक तास डॉक्टर व अन्य अधिकारी आरोग्य केंद्राकडे फिरकले नाहीत. त्यांनी डाॅक्टर व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा दर्जेदार केल्याचे भलेही दावे केले जातात. मात्र, रुग्णालयाच्या दरवाजात उपचाराअभावी बालकाच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणेबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. (वृत्तसंस्था)