Madhya Pradesh: भारतात लग्नाला मोठं महत्व आहे आणि हा दिवस खास करण्यासाठी लोक विविध गोष्टी करतात. मध्य प्रदेशातही एक अनोखी वरात पाहायला मिळाली. राजगडमध्ये निघालेल्या लग्नाच्या मिरवणुकीत 101 नवरदेव घोड्यांवर स्वार होऊन आले. यावेळी वरातीत आदिवासी नृत्य, उंट, घोडे यांच्या नृत्याने सर्वजण भारावून गेले. या मिरवणुकीत हजारो लोकही सहभागी झाले होते. यावेळी काही कलाकारांनी भगवान शिव, माता पार्वती आणि राधा-कृष्णाचे रुप घेतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही वरात सामूहिक विवाह सोहळ्याची होती. सुथलिया शहरातील रहिवासी असलेले महेश अग्रवाल गेल्या 14 वर्षांपासून आपल्या गावात दरवर्षी 21 ते 51 मुलींचे लग्न लावत आले आहेत. या वर्षी बिओरा येथे 101 मुलींच्या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण शहराला लग्न आणि रिसेप्शनसाठी आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमात ज्यांचे पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते अशा मुलींची लग्ने झाली. यावेळी सर्व 101 जोडप्यांना 1 लाखाची रक्कम भेट म्हणून देण्यात आली.
या कार्यक्रमाला जिल्हाभरातून हजारो लोक पोहोचले. आईच्या आशीर्वादानेच मी हे सर्व करू शकलो, अशी भावना आयोजक महेश अग्रवाल यांनी व्यक्त केली. यावेळी वरातीमध्ये आदिवासी नृत्य, उंट-घोड्यांचे नृत्य, मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बँड लावण्यात आला होता. यावेळी हजारो लोक सहभागी झाले होते. शहरात ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागतही करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी या भव्य-दिव्य आयोजनाचे खूप कौतुक केले.