मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दोन चुलत भावांचे लग्न चर्चेत आले आहे. ना घोडा, ना कार... थेट हेलिकॉप्टरमधून लग्नाची वरात काढण्यात आली आहे. आपल्या दिवंगत आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून लग्नाची वरात काढली. भोपाळच्या कुराना गावातील हेम मंडलोई आणि यश मंडलोई हे दोन चुलत भाऊ त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसह भोपाळपासून 80 किमी अंतरावर असलेल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरला पोहोचले.
हेलिकॉप्टर वराच्या घरी पोहोचताच ही अनोखी वरात पाहण्यासाठी आजूबाजूला मोठी गर्दी झाली. नवरदेवांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "आमच्या दिवंगत आजोबांची इच्छा होती की त्यांच्या नातवाने त्यांच्या लग्नाची मिरवणूक हेलिकॉप्टरने काढावी आणि त्यातून नववधूंना आणावे. आज ते या जगात नसले तरी आमच्या आजोबांचे स्वप्न आमच्या वडिलांनी पूर्ण केले आहे."
"आम्ही आमच्या मुलांच्या लग्नाची वरातही हेलिकॉप्टरवर नेऊ"
ते म्हणाले, "आता ही आमच्या कुटुंबाची परंपरा बनली आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी भविष्यातही आम्ही आमच्या मुलांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करू." यावेळी कुटुंबीय खूपच आनंदी दिसत होते. मात्र, मंडलोई कुटुंबाने लग्नाच्या मिरवणुकीसाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी घरातील पहिल्या मुलाचे लग्न झाले की, त्यावेळी हेलिकॉप्टरही भाड्याने घेण्यात आले होते.
हेलिकॉप्टरसाठी 5 ते 6 लाख रुपये खर्च
कुटुंबातील पुत्र देवेंद्र मंडलोई हे कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत, ज्यांची 2014 मध्ये हेलिकॉप्टरने मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी त्यांची मिरवणूक शाजापूर जिल्ह्यातील मटाणा गावात नेण्यात आली. मंडलोई कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, एका वेळी हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी सुमारे 5 ते 6 लाख रुपये खर्च येतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"