मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 01:48 PM2020-06-02T13:48:09+5:302020-06-02T14:57:59+5:30
काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे बहुमताचे समीकरण साधून मध्य प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन पुनरागमन केल्यानंतर आता येथील राज्यसभेच्या निवडणुकीत वर्चस्व राखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
भोपाळ - देशात एकीकडे कोरोना विषाणू विरोधात लढाई सुरू असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यसभेच्या या २४ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच राजकीय नाट्य रंगलेल्या मध्य प्रदेशमध्येही राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. येथे नुकतेच भाजपात दाखल झालेले बडे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे अनुभवी नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे येथील राज्यसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे बहुमताचे समीकरण साधून मध्य प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन पुनरागमन केल्यानंतर आता येथील राज्यसभेच्या निवडणुकीत वर्चस्व राखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे हे २० आमदारांसह भाजपाकडे आल्याने भाजपाचे पारडे जड झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपाकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोळंकी, तर काँग्रेसने दिग्विजय सिंह आणि फूल सिंह बरैया यांना मैदानात उतरवले आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांना अनुक्रमे प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे तिसऱ्या जागेसाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसच्या २२ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे समीकरण बिघडले आहे.
आंध्र प्रदेश आणि गुजरामधील प्रत्येकी ४, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी ३, मणिपूर आणि मेघालयमधील प्रत्येकी एक, झारखंडमधील २ तसेच जून-जुलैमध्ये रिक्त होत असलेल्या कर्नाटकमधील ४ आणि अरुणाचल प्रदेश व मिझोराममधील प्रत्येकी एक अशा मिळून २४ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
हे कारण वाढवतेय भारतात कोरोनाच्या संसर्गाचा धोका, तज्ज्ञांचीही वाढली चिंता
ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी
क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...
शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध
गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी