Viral Video : देशभरात उन्हाच्या झळा बसत असल्याने अनेकजण त्यापासून वाचण्यासाठी स्विमिंग पूलचा आधार घेताना दिसत आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण स्विमिंग पूलचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. मात्र याच स्विमिंग पूलमधील स्टंटबाजीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. स्विमिंग पूलमध्ये मित्राच्या चुकीमुळे तरुणाचा बुडतानाचा एक सीसीटीव्ही व्हिडीओदेखील समोर आला आहे. मित्राच्या स्टंटबाजीमुळे तरुणाचा जीव गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मध्य प्रदेशतील रतलाम जिल्ह्यातून ही मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रतलाम जिल्ह्यातील सैलाणा रोडवर असलेल्या डॉल्फिन स्विमिंग पुलमध्ये रविवारी हा अपघात झाला. मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मित्राच्या स्टंटमुळे मृत्यू झाला. स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना एका तरुणाचा पाय मृताच्या चेहऱ्याला लागल्याने तो पाण्यात बुडाला. तरुणाला बाहेर काढून वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला जबर धक्का बसला आहे.
रविवारी संध्याकाळी अनिकेत तिवारी हा मित्र पियुष, हर्ष आणि तुषार पडियारसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी आला होता. मात्र स्टंटबाजी करताना १८ वर्षीय अनिकेतला आपला जीव गमवावा लागला. ही घटना घडली तेव्हा लाइफ गार्ड असता तर अनिकेतला वेळीच रुग्णालयात नेल्याने त्याचा जीव वाचू शकला असता. धक्कादायक बाब म्हणजे अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतरही स्विमिंग पूल उशिरापर्यंत सुरुच होता. त्यामुळे स्विमिंग पूल चालकाचा निष्काळजीपणा दिसून आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पूल बंद केला.
नेमकं काय घडलं?
मृत तरुणाचे नाव अनिकेत असल्याचे समोर आलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये मृत अनिकेत स्विमिंग पूलमधून बाहेर येऊन कठड्यावर बसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तितक्यात अनिकेतच्या शेजारच्या तरुणाच्या डोक्यावरुन एका तरुणाने उडी मारली. मात्र अनिकेत बाहेर येत असतानाच तरुणाचा गुडघा त्याच्या चेहऱ्यावर आदळल्याने तो पाण्यात पडला. सुरुवातीला तिथे असलेल्या लोकांना काहीच कळालं नाही. शेवटी अनिकेत पाण्यातून बाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनीच त्याला वर काढले. अनिकेतला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी सहा मिनिटे लागली. हा सगळा प्रकार घडला तेव्हा घटनास्थळी एकही लाइफ गार्ड उपस्थित नव्हता. त्यानंतर अनिकेतला वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, स्विमिंग पूलमधील लाइफ गार्डच्या निष्काळजीपणामुळे अनिकेतचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या मित्राने केला आहे. "आम्ही स्विमिंग पूलमधील लाइफ गार्डला अनिकेतचा पूलमध्ये शोध घेण्यास सांगितले होते. पण ते बराच वेळ आले नाहीत. नंतर एक ट्रेनर आला ज्याने अनिकेतचा शोध घेतला आणि त्याला स्विमिंग पूलमधून बाहेर काढले. यानंतर अनिकेत रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनिकेतला सुमारे सहा मिनिटे २० सेकंदांनंतर स्विमिंग पूलमधून बाहेर काढण्यात आले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला,” अशी माहिती अनिकेतचा मित्र पीयूषने दिली.