एका आईला मुलाच्या अखेरच्या क्षणी त्याला मिठी मारता आली नाही तर वडिलांना मुलाच्या डोक्यावरून हात फिरवता आला नाही. भावांनाही अंत्ययात्रेत खांदा देऊन अखेरचा निरोप देता आला नाही. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील कन्नौड येथील आहे. याठिकाणी राहणारा एक तरुण कामानिमित्त कोलकाता येथे गेला होता, पण तो जिवंत परतला नाही इतकेच नाही तर त्याचा मृतदेह कोलकाताहून त्याच्या गावी येऊ शकला नाही. मजबुरीने कुटुंबीयांनी कोलकात्यातच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. कुटुंबातील सदस्य व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यसंस्कारात सहभागी झाले.
अंतर जास्त असल्यानं मृतदेह आणता आला नाही
मिळालेल्या माहितीनुसार, देवास जिल्ह्यातील कन्नौड तहसीलच्या थुरिया गावात राहणारा रतन (३४) हा कंडक्टर म्हणून काम करायचा. कामानिमित्त तो आपल्या गावातील झाकीर पठाणसोबत इंदूरहून कोलकाता येथे गेला होता. इंदूरहून कोलकाता येथे जात असताना त्याची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर झाकीरने रतनच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर झाकीरने रतनला रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान रतनचा मृत्यू झाला. कोलकातापासून मृत रतनच्या गावाचे अंतर सुमारे १५०० किमी असून त्यामुळे त्याचा मृतदेह गावी आणता आला नाही.
मृतदेह गावी नेण्यासाठी ३ दिवस विमानतळावर करावी लागली प्रतिक्षा
सोमवारी युवक रतनचा मृत्यू झाला, त्यानंतर रुग्णवाहिका चालक बिट्टू गुप्ता मृतदेह विमानतळावर पोहचवण्यासाठी गेला. येथे त्याने कागदोपत्री काम पूर्ण केले. मात्र सोमवारी विमानाच्या वेळेपूर्वी त्याला एनओसी मिळू शकली नाही, त्यामुळे बिट्टू मृतदेह पॅक करून परत आला. मंगळवारी सकाळी विमानतळावर पोहोचले तोपर्यंत फ्लाइटची वेळ झाली होती. बिट्टूने मृतदेह शवागारात ठेवला आणि मृतदेह घेऊन मंगळवारी रात्री विमानतळ प्राधिकरणाकडे पोहोचला, मात्र विमानतळ प्राधिकरणाने मृतदेहाला केमिकलचा वास येत असल्याचे सांगून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला, त्यानंतर रुग्णवाहिका चालक बिट्टूने मृतदेह परत आणला. दुहेरी पॉलिथिनने त्याचे पॅकिंग केले, बुधवारी सकाळी विमानतळावर पोहोचल्यावर विमानतळ प्राधिकरणाने पुन्हा तेच कारण देत मृतदेह नेण्यास नकार दिला.
सर्व प्रयत्न करूनही रतनचा मृतदेह कोलकाताहून देवासला आणता आला नाही, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी मजबुरीने रुग्णवाहिका चालक बिट्टूला कोलकाता येथे अंत्यसंस्कार करण्यास सांगितले, त्यानंतर बुधवारी दुपारी बिट्टू गुप्ता त्याच्या काही साथीदारांसह रतनवर अंत्यसंस्कार केले. यावेळी रतनचा साथीदार झाकीर पठाण हा बिट्टूसोबत उपस्थित होता. रतनच्या अंत्यसंस्कारानंतर आता झाकीर अस्थिकलश घेऊन कोलकाताहून थुरियाला येत असून, अस्थिकलश गावात पोहोचण्यास सुमारे ४८ तास लागतील. मृत रतन हा तीन भावांमध्ये मधला होता. वडील रेवाराम यांच्यासोबत त्यांचा मोठा भाऊ विक्रम शेतीची कामे पाहतो. धाकटा भाऊ चरणसिंग बाँडिंगचे काम करतो. कुटुंबाकडे फक्त ३ एकर जमीन आहे. रतन विवाहित होता पण त्याची पत्नी एकत्र राहत नव्हती.