मध्य प्रदेशात एका विद्यार्थ्याच्या नावावर मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आली, जी पाहून तो हैराण झाला. मुलाच्या खात्यातून 46 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आणि त्याला त्याची माहितीही नव्हती. विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की, जेव्हा त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस मिळाली तेव्हाच त्याला या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली.
आयकर आणि जीएसटी विभागाने त्याला सांगितलं की, मुंबई आणि दिल्लीत त्याच्या नावावर दोन कंपन्या सुरू आहेत. या कंपन्यांशी संबंधित कामांसाठी हे व्यवहार झाले आहेत. एवढेच नाही तर आश्चर्याची बाब म्हणजे या कंपन्या 2021 पासून सुरू आहेत. प्रमोद कुमार दंडोतिया असं या मुलाचं नाव आहे. प्रमोदने सांगितलं की, कोणीतरी त्याच्या पॅन कार्डचा गैरवापर केला आहे आणि हे नेमकं कसं घडलं याची त्याला अजिबात कल्पना नाही.
प्रमोद कुमार दंडोतिया म्हणाला की, तो ग्वाल्हेरमधील एका महाविद्यालयात शिकतो. त्याला नोटीस मिळाली की दिल्ली आणि मुंबईमध्ये त्याच्या नावावर एक कंपनी नोंदणीकृत आहे जी 2021 पासून सुरू आहे. प्रमोदच्या म्हणण्यानुसार, पॅन कार्डचा गैरवापर कसा झाला आणि हा व्यवहार कसा झाला हे माहीत नाही. त्याने याबाबत तक्रार केल्याचंही सांगितलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर तो पोलिसांकडे गेला मात्र तेथेही त्याला मदत मिळाली नाही.
29 मार्च रोजी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार घेऊन पोहोचल्याचं त्याने सांगितलं. जिथे त्याला थोडा दिलासा मिळाला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) शियाझ के एम यांनी एनआयला सांगितलं की, एका तरुणाच्या खात्यातून 46 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवहार झाला असून या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. अतिरिक्त अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार पॅनकार्डचा गैरवापर करून कंपनीची नोंदणी करून एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार करण्यात आला आहे.