आता हेल्मेट नाही तर दारू नाही! अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा नवा उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:16 PM2022-10-18T12:16:08+5:302022-10-18T12:18:22+5:30
रस्ते अपघात रोखण्यासाठी नाना प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
जबलपूर : रस्ते अपघात रोखण्यासाठी नाना प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. हेल्मेट सक्तीचा निर्णय देखील त्याचाच एक भाग आहे. मात्र आता रस्ते अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आणखी एक उपाय काढला आहे. त्यामुळे लोकांना जरी त्यांच्या जीवाची पर्वा नसली तरी दारू विक्रेत्या दुकानदाराला काळजी घ्यावी लागणार आहे. खरं तर हेल्मेट नसेल तर दारू घेता येणार नाही असा निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. आता हेल्मेट घालणाऱ्यांनाच जबलपूरमध्ये दारू मिळणार आहे. हेल्मेट नसेल तर दारू मिळणार नाही. या आदेशाची अंमलबजावणीही तातडीने सुरू झाली आहे.
वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी जबलपूर उच्च न्यायालयाने मध्य प्रदेशसरकारला दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले होते. शासनाने देखील याची दखल घेत आदेश दिले असून वाहतूक पोलिसांकडूनही हेल्मेट घालण्याची जोरदार मोहीम राबवली जात आहे. मात्र वाहनचालक याच्याकडे कानाडोळा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता उत्पादन शुल्क विभागाने दोन पावले पुढे जाऊन नवा आदेश काढला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
आदेशात म्हटले...
उत्पादन शुल्क विभाग जबलपूर यांनी दारू दुकान चालकांना आदेश देऊन ही बाब कळवली आहे. लक्षणीय म्हणजे हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांना दारू देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. दुकानाच्या बाहेर बॅनर पोस्टर्स लावून ग्राहकांनी याबाबतची माहिती द्यावी. हेल्मेटशिवाय वाहनचालकांना दारू दिली जाणार नाही, ही सूचना कळवावी. असे या आदेशात म्हटले असून याची अमंलबजावणी सुरू झाली आहे. दुकानदारांनी आता बॅनर पोस्टर्स लावले आहेत. त्यामुळे आता मद्यप्रेमींना हेल्मेट असल्याशिवाय दारू खरेदी करता येणार नाही.
आता हेल्मेट नाही तर दारू नाही
उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे की, बहुतांश अपघात हे मद्यधुंद वाहनचालकांमुळे होतात. हेल्मेटचा वापर न करता मद्यपान करून वाहने चालवून लोक आपला व इतरांचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे आता हेल्मेटशिवाय दारू खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या या नव्या उपक्रमाला दारूच्या दुकानात काम करणारे कर्मचारी सहकार्य करत आहेत. हेल्मेटशिवाय येणाऱ्या ग्राहकांना दारू देण्यास ते नकार देत आहेत. दररोज होणारे अपघात टाळण्यासाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली तर नक्कीच त्याचे चांगले परिणाम होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"