ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १५ - बीफ जवळ बाळगल्याच्या संशयावरुन मध्यप्रदेशच्या हारदा जिल्ह्यात खिरकिया रेल्वे स्थानकात एका मुस्लिम दांम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गौरक्ष समितीचे सदस्य हेमंत राजपूत आणि संतोष या दोघांना अटक केली आहे.
४३ वर्षीय मोहम्मद हुसेन आणि त्यांची पत्नी नसीमा बानो बुधवारी खुषीनगर एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. त्यावेळी गौरक्ष नामक समितीच्या सात सदस्यांनी डब्ब्यामध्ये प्रवेश केला आणि या मुस्लिम दांम्पत्याजवळ बीफ असल्याच्या संशयावरुन त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली.
या दांम्पत्याजवळून बीफ जप्त केल्याचा समितीच्या सदस्यांनी दावा केला होता पण प्रयोगशाळेतील तपासणीत ते बीफ नव्हे तर, म्हशीचे मांस असल्याचे निष्पन्न झाले. आम्हाला ट्रेनमध्ये बीफ असल्याची टीप मिळाली होती. म्हणून आम्ही तपासणी केली असे अटक केलेल्या हेमंत आणि संतोषने सांगितले.
यापूर्वी उत्तरप्रदेशात दादरीमध्ये गोमांस घरात शिजवल्याच्या संशयावरुन झालेल्या मारहाणीत मोहम्मद अखलाख यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद आजही उमटत असताना या नव्या प्रकरणामुळे पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.