ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - शरीरासाठी घातक असलेले पदार्थ आढळलेल्या मॅगीची जाहिरात करणे अभिनेत्री माधुरी दिक्षीतला भोवण्याची चिन्हे आहेत. हरिद्वारच्या अन्न व प्रशासन विभागाने (एफडीए) या जाहिरातीवरुन माधुरी दिक्षीतला नोटीस बजावली आहे. जनतेची दिशाभूल करणारी ही जाहिरात असून यासंदर्भात १५ दिवसांत स्पष्टीकरण द्यावे असे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश येथे मॅगीमध्ये शरीरासाठी अपायकारक घटक आढळून आले होते. हा प्रकार समोर आल्यावर देशभरात मॅगीवर बंदी टाकण्याचे प्रयत्न सुरु असून मॅगीची जाहिरात करणारी माधुरी दिक्षितही अडचणीत आली. मॅगीच्या एका जाहिरातीमध्ये गव्हाच्या पीठापासून तयार केलेली मॅगी खाल्ल्याने तीन चपात्यांपासून मिळेल ऐवढे फायबर मिळते असा दावा करण्यात आला आहे. हरिद्वारमधील अन्न व प्रशासन विभागाने या दाव्यावर आक्षेप घेत माधुरीलाही नोटिस बजावली आहे. माधुरीकडून उत्तर आले नाही तरमॅगी उत्पादक कंपनी नॅस्ले व त्यांची जाहिरात करणारी माधुरी या दोघांवरही कायदेशीर कारवाई करु असे प्रशासनाने म्हटले आहे.