कार खरेदीवर पाच वर्षांचा विमा घेण्याची सक्ती नाही; मद्रास हायकोर्टाचा खरेदीदारांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:53 AM2021-09-15T05:53:18+5:302021-09-15T05:54:16+5:30
कार खरेदीदारांसह वाहन उत्पादक कंपन्या आणि वितरकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नवीन कार खरेदी करतानाच संपूर्ण पाच वर्षांचा विमा खरेदी करणे आवश्यक नाही, असा नवा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कार खरेदीदारांसह वाहन उत्पादक कंपन्या आणि वितरकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
४ ऑगस्ट रोजी मद्रास उच्च न्यायालयाने एका निवाड्यात कार खरेदी करतेवेळीच सलग ५ वर्षांचा विमा घेणे बंधनकारक करण्याची अट घातली होती. या निवाड्यात आता उच्च न्यायालयाने दुरुस्ती केली. सामान्य विमा कंपन्या, वाहन उत्पादक कंपन्या आणि विमा एजंटांच्या संघटना यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आदेशात सुधारणा केली.
आपला उद्देश केवळ प्रवाशांची सुरक्षा हाच आहे. जुन्या निवाड्यातील आदेश आता केवळ सल्ला म्हणून राहील व निवाड्यात त्यानुसार बदल केले जातील, तसेच यासंबंधी कायदा बनविण्याचा निर्णय संसदेवर सोपविला जाईल, असे न्यायालयाने नमूद केले.
किंमतवाढ झाली असती
एकदम ५ वर्षांचा विमा बंधनकारक केल्याने गाड्यांच्या किमतीत ५० हजार ते २ लाख रुपयांची वाढ होत होती. आपल्या आदेशाच्या अंमलबजावणीवर न्यायालयाने सूचना मागविल्या होत्या. वाहन कंपन्या, वाहन नियामक इरडासह अनेक संस्थांचा या निर्णयाला विरोध होता.