चेन्नई, दि. 10 - माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमविरोधात सीबीआयकडून जारी करण्यात आलेल्या लूकआऊट नोटीसला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. न्यायमूर्ती एम. दुराईस्वामी यांनी सुनावणीदरम्यान लूक आऊट नोटीसला स्थगिती दिली आहे. कार्ती यांच्या वतीनं वरिष्ठ वकील गोपाल सुब्रमणियन आणि सतीश परासरन यांनी युक्तिवाद केला. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त सॉलिसिटर-जनरल जी. राजागोपालन उपस्थित होते. सीबीआयने ही नोटीस जारी केली असून कार्ती चिदंबरम यांना देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचारप्रकरणी कार्ती चिदंबरम यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, कार्ती चिदंबरम यांनी सीबाआयच्या नोटीसला विरोध करत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही नोटीस रद्द करण्याची कार्ती यांची मागणी मद्रास हायकोर्टानं मान्य केली आहे. जेव्हा एखादी संशयित व्यक्ती तपासाला बगल देत देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते, अशा वेळी तपास यंत्रणा सरकारला लूकआऊट नोटीस जारी करण्याची विनंती करते. कार्ती चिदंबरम यांनी देशाबाहेर दौरा करण्याआधी त्याची माहिती सीबीआय तसंच सक्तवसुली संचलनालयाला द्यावी असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं होतं. तपास यंत्रणांनी संमती दिली तरच कार्ती चिदंबरम देशाबाहेर प्रवास करू शकतात. कार्ती चिदंबरम यांनी मात्र आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसून, राजकीय हेतून आरोप होत असल्याचा दावा केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी कार्ती यांच्यासह आयएनएक्स मीडियावर एफआयआर दाखल केला होता. या दोघांवर विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून (एफआयपीबी) मंजुरी मिळवून विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सीबीआयनेही कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर दाखल केला होता. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. पी चिदंबरम यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले होते.
मद्रास उच्च न्यायालयानं कार्ती चिदंबरमविरोधातल्या लूकआऊट नोटीसला दिली स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 4:16 PM