नवी दिल्ली : टिकटॉक अॅपवर घालण्यात आलेली बंदी मद्रास हायकोर्टाने हटविली आहे. टिकटॉक अॅपवरील बंदी हटविण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 24 एप्रिलपर्यंत निर्णय घ्यावा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाला दिला होता. यावर आज मद्रास हायकोर्टात सुनावणी झाली असता टिकटॉक अॅपवर घातलेली बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, 24 एप्रिलपर्यंत मद्रास हायकोर्टाने या याचिकेवर कोणताही निर्णय घेतला नाही तर हायकोर्टाने टिकटॉकवर घातलेल्या बंदीचा आदेश रद्दबातल होईल असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. विशेष म्हणजे मागच्या आठवडण्यात सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाने घेतलेला निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.
मद्रास हायकोर्टाने टिकटॉक अॅपवर घातलेल्या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली होती. मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला याबाबत निर्देश देऊन टिकटॉक अॅपवर बंदी आणण्याची सूचना केली होती त्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून गुगल आणि अॅपलला टिकटॉक अॅप प्ले स्टोअरवरुन हटविण्याचे आदेश दिले होते.
टिकटॉक अॅपच्या माध्यमातून समाजात अश्लिलता पसरवली जात आहे असा आरोप करत समाजसेवक आणि ज्येष्ठ वकील मुथु कुमार यांनी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती. टिकटॉकच्या माध्यमातून आत्महत्या आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप या याचिकेत करत टिकटॉकवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुगल आणि अॅपला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अॅप हटविण्यास सांगितले होते. सरकारच्या या आदेशानंतर लोकांना आता टिकटॉक अॅप डाउनलोड करता येत नव्हते मात्र ज्या लोकांकडे आधीपासून हा अॅप आहे त्यांना तो पहिल्यासारखा वापरता येत होते.