लखनौ - उत्तर प्रदेशातील कारागृहात अंडरवर्ल्ड डॉन प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बागपत जिल्ह्यामधील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डेप्युटी जेलरसहीत चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या हत्येप्रकरणी बागपत कारागृहातच शिक्षा भोगत असणाऱ्या गँगस्टर सुनील राठीच्या शार्पशूटर्सवर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी कारागृहात एक तपास पथक दाखल झाले आहे.
प्रकाश उर्फ मुन्नाला आज बागपत न्यायालयात हजर करण्यात येणार होते. कुख्यात गुंड सुनील राठी आणि विक्की सुनहेडासोबत मुन्नाला कोठडीत ठेवले होते. मात्र, न्यायालयात हजर करण्यापूर्वीच त्याला ठार करण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीला बसपाचे माजी आमदार लोकेश दीक्षित यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणाच्या खटल्यात बागपत न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच 10 गोळ्या मारुन तुरुंगातच त्यास ठार करण्यात आले.
मुन्नाच्या कुटुंबातील सदस्य विकास श्रीवास्तव यांनी सुनील राठीवर हत्येचा आरोप केला. तुरुंगातच कैद असलेल्या सुनील राठीच्या शूटर्सनं मुन्नावर 10 गोळ्या झाडल्याचेही श्रीवास्तवनं म्हटले आहे. मुन्नाला जौनपूरचे दबंग गजराजसिंह यांचे संरक्षण मिळाले होते. त्यामुळे गुन्हेगारी जगतात मुन्नाचे पाय खोलवर रुजले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.