लखनऊ - दोन मिनिटांत शिजणारी नेस्ले इंडियाची 'मॅगी' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेस्ले इंडियाचा लोकप्रिय ब्रॅण्ड मॅगी लॅब टेस्टमध्ये पुन्हा एकदा फेल झाली आहे. मॅगी लॅब टेस्टमध्ये फेल झाल्याने उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडिया आणि वितरकांना दंड ठोठावला आहे. जिल्हा प्रशासनाने नेस्लेला 45 लाख तर तीन वितरकांना 15 लाख आणि दोन विक्रेत्यांना 11 लाखांचा दंड ठोठावला आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मॅगीचे नमुने गोळा करुन चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. चाचणीत मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असून सेवनासाठी अपायकारक असल्याचं सिद्ध झालं आहे. नेस्ले इंडियाने प्रयोगशाळेच्या निष्कर्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून आपल्याला अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं सांगितलं आहे. आपल्याला ऑर्डर मिळताच त्याविरोधात अपील करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
'अधिका-यांकडून जारी करण्यात आलेली ऑर्डर आम्हाला अद्याप मिळालेली नाही. मात्र हे नमुने 2015 चे असून शिशाचे प्रमाण अधिक असण्याचा मुद्दा असल्याचं कळालं आहे', अशी माहिती नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
याआधी 2015 मध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. नेस्ले कंपनीच्या नऊ प्रकारच्या मॅगी नूडल्सवर भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा मानक प्राधिकरणाने (एफएसएसआय)ने बंदी घातली होती. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या २० चाचण्यांपैकी पाच चाचण्यांत मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा अधिक आढळले होते. मात्र अन्य १५ चाचण्यांमध्ये तसे आढळले नव्हते. त्यामुळे मॅगी मानवी शरीरासाठी अपायकारक असल्याचा सरकारचा दावा चुकीचा असून मॅगीवर घातलेली बंदीही जुलमी आहे, असा युक्तिवाद नेस्ले कंपनीने मुंबई हायकोर्टात केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नेस्लेच्या नानजानगुड(कर्नाटक), मोगा(पंजाब) आणि बिछोलीम (गोवा) येथील कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या मॅगी नुडल्सचे सर्व नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व चाचण्यांमध्ये मॅगी नुडल्स यशस्वी ठरली होती. मॅगी खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल त्यावेळी मिळाला होता.
नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात सशर्त उठवली होती. या नूडल्सच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करून घ्यावी व त्यातून हे खाद्यान्न सेवनासाठी अपायकारक नाही असे निष्पन्न झाले तरच कंपनीला हे उत्पादन पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणता येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. मोहाली (पंजाब), हैदराबाद व जयपूर येथील प्रयोगशाळांमध्ये मॅगी नूडल्सची प्रत्येकी पाच सँपल्स चाचणीसाठी पाठवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार या तिनही प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या नमून्यांची चाचणी करण्यात आली असून ती सुरक्षित आहे, असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.