ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मॅगी नूडल्सच्या नमून्यांची तीन प्रयोगशाळांमधील तपासणीत मॅगी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा 'नेस्ले' कंपनीने केला असून महिन्याभरात मॅगी पुन्हा विक्रीस उपलब्ध असेल असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, कर्नाटकमधील नांजनगुड, पंजाबमधील मोगा आणि गोव्यातील बिचोली येथील प्लान्ट्समध्ये उत्पादित करण्यात आलेल्या मॅगी नूडल्सच्या नमून्यांची तीन राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाला सकारात्मक आला असून त्यात मॅगी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याचे 'नेस्ले' कंपनीने म्हटले आहे.
नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात सशर्त उठवली होती. या नूडल्सच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करून घ्यावी व त्यातून हे खाद्यान्न सेवनासाठी अपायकारक नाही असे निष्पन्न झाले तरच कंपनीला हे उत्पादन पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणता येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. मोहाली (पंजाब), हैदराबाद व जयपूर येथील प्रयोगशाळांमध्ये मॅगी नूडल्सची प्रत्येकी पाच सँपल्स चाचणीसाठी पाठवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.
त्यानुसार या तिनही प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या नमून्यांची चाचणी करण्यात आली असून ती सुरक्षित आहे, असे आज कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.