कानपूर : ‘मुगल-ए-आजम’ चित्रपटाचे नाव येताच पृथ्वीराज कपूर, दिलीपकुमार, मधुबाला, दुर्गा खोटे आदींच्या भूमिका आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यातील प्यार किया तो डरना क्या, मुहब्बत की झुठी कहानी पे रोये, ऐ मुहब्बत झिंदाबाद अशी सर्वच १२ गाणी तोंडी येतात. कथेइतकेच शकिल बदायुंनी यांची ती गीते आणि नौशाद यांचे संगीत हेही या चित्रपटाचा आत्मा होते. एक अमर प्रेमकथा म्हणून गाजलेल्या या कलाकृतीची जादू कायम राहावी, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक अनोखा निर्णय ‘मुगल-ए-आजम’या चित्रपटाच्या कल्पनेवर आधारित थिम पार्क इटावात उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक के. आसिफ यांचा जन्म याच ठिकाणचा आहे, हे विशेष. (वृत्तसंस्था)>पर्यटनालाही चालनाहे थिम पार्क चित्रपट निर्माते व या चित्रपटाला समर्पित असेल. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी याबाबत पर्यटन विभागाला या योजनेबाबत गतीने पावले उचलण्यास सांगितले आहे. इटावा येथील रहिवासी मेहफूज अली याबाबत बोलताना म्हणाले की, या चित्रपटाच्या निर्मात्यांना ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे. येथील स्थानिक कलाकार राघव याबाबत बोलताना म्हणाले की, मुगल -ए-आजम ही एक अशी कलाकृती आहे की, त्यानंतरच्या निर्मात्यांच्या पिढ्यांना ती कायम मार्गदर्शन करत आहे. दरम्यान, या थिम पार्कमुळे या भागातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के. आसिफ यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाचा राज्य सरकार सन्मान करणार आहे. इटावामध्ये करीमुद्दीन आसिफ उर्फ के. आसिफ यांचा जन्म १४ मार्च १९२२ रोजी डॉ. फाजल करीम यांच्या कुटुंबात झाला. चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी के. असीफ नंतर मुंबईला गेले. इटावा शहरात सध्या लायन सफारी आहेच. त्याच्या जवळच मुगल-ए-आजम पार्क उभारण्याचा निर्णय अखिलेश यादव यांनी घेतला आहे. यादव सरकारने गेल्या चार वर्षांत उत्तर प्रदेशात अधिकाधिक पर्यटक यावेत, यासाठी अनेक पावले टाकली असून, हे पार्क त्याचाच भाग आहे.
‘मुगल-ए-आजम’ची जादू पार्कच्या रूपात
By admin | Published: August 27, 2016 4:34 AM