अहमदाबाद : देशभर परीक्षांचा हंगाम सुरु असताना आणि विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही तणावाखाली असताना गुजरातमधील एका मंदिराने परीक्षेत हमखास यश मिळवून देणारे जादुई पेन विकण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे.आपल्या पाल्याला परीक्षेत चांगले यश मिळावे, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी त्याचा चांगला अभ्यास करून घेणारे जसे पालक असतात तसेच अभ्यासाखेरीज इतर मार्गांवर भंरवसा ठेवणारेही पालक असतात. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी देवाचा धावा करणे हे तर नित्याचेच आहे. पालक व विद्यार्थ्यांच्या नेमक्या याच मानसिकतेचे भांडवल करून हा जादुई पेनाचा धंदा सुरु करण्यात आल्याचे दिसते. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुार गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील कष्टभंजन मंदिराने या जादुई पेनाची जाहिरात आणि विक्री करण्यासाठी गुजरातीमधून चक्क पत्रके छापून वाटली आहेत. परिक्षेत यश मिळविण्यासाठी पालक कोणतीही किंमत मोजायला तयार असतात हे लक्षात घेऊन मंदिराने या जादुई पेनाची किंमत १,९०० रुपये एवढी चढी ठेवली आहे. इतकेच नव्हे तर यश न मिळाल्यास पेनासाठी मोजलेली सर्व रक्कम परत करण्याची हमीही दिली आहे. ही सिद्धहस्त पेने फक्त विद्यार्थ्यांनाच विकली जातील याची खात्री करण्यासाठी विद्यार्थ्याच्या परिक्षेचे हॉल तिकिट व शाळा-कॉलेजचे ओखळपत्र आणले तरच पेन मिळेल, अशी अट घातली आहे. हालोल व वडोदरा येथील या पेनांच्या विक्रीकेंद्रांचे पत्ते व संपर्काचे मोबाईल क्रमांकही पत्रकात दिले आहेत.
परीक्षेत पास करणारे जादुई पेन!
By admin | Published: March 13, 2017 12:42 AM