सुपौल – एका सरकारी हॉस्पिटलमध्येसाप चावल्यानं उपचार घेत असलेल्या युवकावर सलाईन लावलेल्या अवस्थेतच मांत्रिकाकडून तंत्रमंत्र उपचार सुरु होते. तांत्रिकाच्या मंत्रानेही युवकाला काही फायदा झाला नाही तेव्हा कुटुंबाने डॉक्टरांच्या समोर हात पसरले. बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील ही घटना आहे. ज्याठिकाणी आजही आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोकांकडून सरकारी हॉस्पिटलमध्येच तंत्रमंत्राचा आधार घेतला जात असल्याने खळबळ माजली.
हॉस्पिटलमधील या प्रकाराची सध्या जिल्हाभरात चर्चा सुरु आहे. तंत्रमंत्रावेळी स्थानिक युवक संजीत कुमार याने व्हिडीओ बनवत या प्रकाराचा विरोध केला असता पीडित युवकाच्या कुटुंबीयांनी त्यावर आक्षेप घेतला. या व्हिडीओत कुटुंबाने संजीत कुमार याला धमकी देताना पाहायला मिळत आहे. कुटुंबीय डॉक्टरांऐवजी मांत्रिकाकडे जात सरकारी हॉस्पिटलमध्येच अंधविश्वासाचा बाजार मांडला. त्यामुळे या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.
हॉस्पिटलमध्ये मांत्रिकाकडून तंत्रमंत्राचा उपचार
सुपौल जिल्ह्यातील भनवानपूर येथे एका युवकाचा सापाने चावा घेतला. कुटुंबाने या युवकाला तात्काळ विभागीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांकडून पीडित युवकावर उपचार सुरू होते. त्याचवेळी साप चावलेला युवक सलाईन लावलेल्या अवस्थेत हॉस्पिटलबाहेर जमिनीवर बसलेला दिसला. तेव्हा कुटुंबीयांकडून एका मांत्रिकाला बोलावण्यात आलं होतं. मांत्रिकाने हॉस्पिटलबाहेरच पीडित युवकावर अघोरी विद्येचे प्रयोग सुरू केले.
युवकाला सलाईन लावलेल्या अवस्थेत तासभर मांत्रिकाकडून भोंदूगिरी सुरु होती. मांत्रिकाच्या अघोरी प्रयोगानंतरही युवकाला लाभ झाला नाही तेव्हा कुटुंबीयांनी पुन्हा डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा डॉक्टरांनी उपचार करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर युवकावरील धोका टळला. या संबंधात बीरपूर विभागीय हॉस्पिटलचे डॉक्टर पंकज कुमार म्हणाले की, सध्या जगानं विज्ञान युगात इतकी प्रगती केलीय परंतु आजही अनेक भागात लोकांची अंधविश्वासात फसवणूक होऊन जीव घेतला जातो. लोकांमध्ये जनजागृती पसरवणं गरजेचे आहे. जेणेकरून मेडिकल सायन्सवर लोकांचा विश्वास बसेल आणि त्यांचा जीव वाचला जाईल. या प्रकरणातून पीडित युवकाच्या घरच्यांनी चांगलाच धडा घेतला. या प्रकरणात मांत्रिकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हॉस्पिटलने सुरू केली आहे.