चेन्नई : महागठबंधन ही संधिसाधू व सधन घराण्यांची अपवित्र युती आहे अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली आहे. स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष महागठबंधन स्थापन करीत आहे, असेही ते म्हणाले.
तामिळनाडूतल्या चेन्नई, मदुराई, तिरुचिरापल्ली, तिरुवल्लूर येथील भाजपा बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मोदींनी संवाद साधला. या महागठबंधनासाठी तेलुगू देसम पार्टी सर्वात जास्त प्रयत्नशील आहे. मुळात हा पक्ष त्याचे संस्थापक एन. टी. रामाराव यांनी काँग्रेसच्या विरोधात स्थापन केला होता; मात्र आता तेलुगू देसम पार्टीचे विद्यमान प्रमुख काँग्रेसच्या कच्छपी लागले आहेत.ते म्हणाले की, राममनोहर लोहिया यांचे विचार आपला प्रेरणास्रोत असल्याचा दावा या महागठबंधनमधील काही पक्ष करतात; मात्र लोहियांनी कायमच काँग्रेस व तिच्या विचारधारेला विरोध केला होता. काही नेत्यांनी फक्त त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महागठबंधनचा घाट घातला असून, तिला कोणताही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हपापलेल्या लोकांनी हे प्रयत्न चालविले असून, त्यांना जनकल्याणाशी काही देणेघेणे नाही. लोकांच्या नव्हे, तर वैयक्तिक आकांक्षांच्या पूर्ततेसाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत.अण्णाद्रमुकचे सरकार बरखास्त केले होतेच्मोदी म्हणाले की, महागठबंधनात सामील होऊ पाहणाऱ्यांपैकी अनेक नेत्यांना काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीच्या काळात अटक झाली होती; मात्र या नेत्यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी टाळला. काँग्रेसने सर्वांवर अन्याय केलेला आहे. त्यातून कोणीही सुटलेले नाही. जनाधार असलेले तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री व अण्णाद्रमुक पक्षाचे प्रमुख एम. जी. रामचंद्रन यांचे सरकार १९८० साली काँग्रेसने बरखास्त केले होते याचीही मोदींनी आठवण करून दिली.