"गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होणार का?", भाजप नेत्यांच्या महाकुंभ मेळ्यातील स्नानाची खर्गे यांनी खिल्ली उडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:55 IST2025-01-27T17:54:17+5:302025-01-27T17:55:10+5:30

"आरएसएस आणि भाजप देशद्रोही आहेत. जर गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल, तर संविधानाचे रक्षण करा," असेही खर्गे यांनी म्हटले आहे. ते महू येथे बोलत होते...

maha kumbh 2025 Will taking a dip in the Ganges eliminate poverty? mallikarjun kharge mocks BJP leaders' bathing at the Mahakumbh Mela | "गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होणार का?", भाजप नेत्यांच्या महाकुंभ मेळ्यातील स्नानाची खर्गे यांनी खिल्ली उडवली

"गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होणार का?", भाजप नेत्यांच्या महाकुंभ मेळ्यातील स्नानाची खर्गे यांनी खिल्ली उडवली

भाजप नेत्यांमध्ये गंगेत डुबकी मारण्याची स्पर्धा सुरू आहे. पण गंगेत डुबकी मारून गरिबी दूर होणार नाही. मला कोणाची भावना दुखावायची नाही, असे म्हणत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप नेत्यांच्या महाकुंभ मेळ्यातील स्नानावरून भाष्य केले आहे. एवढेचन नाही तर, "आरएसएस आणि भाजप देशद्रोही आहेत. जर गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल, तर संविधानाचे रक्षण करा," असेही खर्गे यांनी म्हटले आहे. ते महू येथे बोलत होते.

'त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीही केले नाही' -
खर्गे पुढे म्हणाले, 'मोदी आणि शहा यांनी मिळून एवढे पाप केले आहे की, ते सात जन्मही स्वर्गात जाणार नाहीत. भाजपचे लोक मशिदीखाली मंदिर शोधत आहेत, शिवलिंग शोधत आहेत. एकीकडे भागवत म्हणत आहेत की, असे करू नका आणि दुसरीकडे ते असेच करत आहेत. आज भाजप-आरएसएसचे लोक काँग्रेसबद्दल वाईट बोलत आहेत. पण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीही केले नाही. हे लोक स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांसोबत होते. ते ब्रिटिशांची नोकरी करत होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे काहीही योगदान नाही. यामुळे, तुम्हाला एकत्र येऊन या लोकांना धडा शिकवावा लागेल आणि तुमच्या हक्कांचे रक्षण करावे लागेल."

"गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होते का?" -
गंगा स्नानासंदर्भात बोलताना खर्गे म्हणाले, "अरे भाऊ, गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होते का?' तुम्हाला जेवण मिळते का? मला कुणाचीही भावना दुखवायची नाही. जर कुणी दुखावले गेले असेल तर मी माफी मागतो. पण तुम्ही मला सांगा, जेव्हा मूल उपासमारीने मरत आहे, मूल शाळेत जात नाही, मजुराला मजुरी मिळत नाही, असे असताना, या लोकांची हजारो रुपये खर्च करून डुबकी मारायची स्पर्धा सुरू झाली आहे. टीव्हीवर काहीतरी चांगले येईपर्यंत डुबकी मारत राहतात. अशा लोकांपासून देशाला काहीही फायदा होऊ शकत नाही."

भाजपचं प्रत्युत्तर -
खर्गे यांच्या विधानावर भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले, "ते (खर्गे) इतर कुण्या धर्माबद्दल असे बोलू शकतात का? सनातन धर्माविरुद्ध असे शब्द आणि विधान निषेधार्ह आहे. काँग्रेस पक्षाने यावर स्पष्टीकरण द्यायला हवे. आपण सत्तेत आलो तर सनातन संपून टाकू, असे म्हणणारे हे तेच खर्गे आहेत."

Web Title: maha kumbh 2025 Will taking a dip in the Ganges eliminate poverty? mallikarjun kharge mocks BJP leaders' bathing at the Mahakumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.