Maha Kumbh Mela 2025 :उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पुढील वर्षी महाकुंभ होणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (6 ऑक्टोबर) आढावा बैठक घेतली. यादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाकुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविकांच्या भावनांचा आदर करत प्रयागराजमध्ये मांस आणि मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाकुंभाच्या तयारीसाठी मुदत ठरवून दिली. त्यानुसार, 10 डिसेंबरपर्यंत महाकुंभाची सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी 2025 च्या महाकुंभात स्वच्छता, सुरक्षा आणि सुव्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले.
गंगा यमुनेबाबत मोठी घोषणामहाकुंभपूर्वी गंगा-यमुना स्वच्छ होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. याशिवाय बिजनौर ते बलियापर्यंत गंगेचे शून्य विसर्जन असेल. म्हणजेच बिजनौर ते बलियापर्यंत कोणताही कचरा गंगेत सोडला जाणार नाही. याशिवाय, महाकुंभपूर्वी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पोलादी पूल तयार करून कानपूर, लखनौ, बाराबंकी आणि अयोध्या येथून प्रयागराजपर्यंत वाहतूक सुलभ करण्यास सांगितले आहे. जेणेकरून येथे येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षा व्यवस्थायोगी सरकारने महाकुंभात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी विशेष योजना आखली आहे. विमानतळ ते महाकुंभ परिसरापर्यंत व्हीव्हीआयपी कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने परिसरात तीन पोलीस लाईन, तीन महिला पोलीस ठाणे आणि 10 पोलीस चौक्या स्थापन करण्यात येणार आहेत. याशिवाय, अग्निशमन सेवा, हेल्प डेस्क, पार्किंग, सीसीटीव्ही आणि ड्रोनविरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.